अंगणवाडी धान्य गोदामाची सभापती अनुराधा नारकरांकडून अचानक पाहणी

धान्याचा दर्जा, साठा व नोंदींची केली तपासणी; वेळेत पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

कुडाळ :
महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांनी अंगणवाडी केंद्रांना पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याच्या गोदामाची अचानक पाहणी करून धान्यसाठा, दर्जा, स्वच्छता तसेच पुरवठा व्यवस्थेची तपासणी केली.

पाहणीदरम्यान गोदामातील बंदिस्त धान्याची पाकिटे उघडून त्यांचा दर्जा तपासण्यात आला. तसेच धान्याची मांडणी, साठवणूक, स्वच्छता आणि संबंधित रजिस्टर व नोंदींची पाहणी करण्यात आली. यावेळी गोदामातील धान्यसाठा व्यवस्थित व सुव्यवस्थित असल्याचे आढळून आले.

अंगणवाडीतील बालकांना पोषण आहाराचा पुरवठा वेळेत व सुरळीतपणे मिळणे आवश्यक असल्याने धान्याचा पुरवठा नियोजित वेळेत सर्व अंगणवाडी केंद्रांपर्यंत पोहोचवावा, अशा स्पष्ट सूचना सभापती अनुराधा नारकर यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच धान्यसाठवणुकीच्या ठिकाणी स्वच्छता राखणे, नोंदी नियमित अद्ययावत ठेवणे आणि पुरवठ्यात कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

या पाहणीवेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, पंचायत समिती कुडाळचे सभापती मिलिंद नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) प्रतीक उगारे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अंगणवाडीतील बालकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत व योग्य पद्धतीने मिळावा, यासाठी अशा प्रकारच्या नियमित तपासण्या व प्रत्यक्ष पाहणी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.