कणकवलीत गोवा बनावटीच्या मद्यासह कार जप्त; १२.९० लाखांचा मुद्देमाल ताब्यात

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; विविध ब्रँडच्या मद्याचे ३९ बॉक्स जप्त, कारचालक ताब्यात

कणकवली : कणकवली येथील दारिस्ते-पवारवाडी परिसरात फोंडाघाटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाची तपासणी करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यासह कार जप्त केली. या कारवाईत विविध ब्रँडच्या मद्याचे ३९ बॉक्स जप्त करण्यात आले असून, कारसह एकूण १२ लाख ९० हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कणकवलीतील दारिस्ते-पवारवाडी येथे फोंडाघाटच्या दिशेने जाणाऱ्या एमएच २२ एलव्ही ९६९९ क्रमांकाच्या सिल्व्हर रंगाच्या स्विफ्ट कारची तपासणी करण्यात आली. यावेळी कारमध्ये गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याचे आढळून आले.

कारवाईत विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचे ३९ बॉक्स जप्त करण्यात आले. जप्त मद्याची अंदाजे किंमत ६ लाख ९० हजार २३० रुपये, तर कारची किंमत ६ लाख रुपये आहे. इतर मुद्देमालासह एकूण १२ लाख ९० हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी कारचालक नितीन ज्ञानदेव (वय ३४, रा. वासुदेव गल्ली, स्मशानभूमीजवळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही कारवाई विभागीय उपायुक्त विजय चिचाळकर व अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नितीन शिंदे, जवान स्नेहल कोंकसकर, अजित गावडे व हेमंत वस्त यांनी केली. या कारवाईस मदतनीस म्हणून साजिद शहा व सलाउद्दीन खान यांनी सहकार्य केले.

या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग, कणकवलीचे निरीक्षक नितीन शिंदे करीत आहेत.