नेरूरमध्ये विज्ञान खेळणी कृती सत्रातून विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी

७७ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; प्रयोगातून वैज्ञानिक संकल्पनांचे सुलभ आकलन

नेरूर,  : मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल, नेरूर यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूर येथे विज्ञान खेळणी कृती सत्राचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील विविध संकल्पना केवळ पाठ्यपुस्तकातून न शिकवता प्रत्यक्ष कृती व खेळण्यांच्या माध्यमातून सहज, मनोरंजक आणि रंजक पद्धतीने समजावून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कृती सत्रासाठी मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्याचा संच उपलब्ध करून देण्यात आला. या साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी घर्षण, गुरुत्वमध्य, हवेचा दाब, ध्वनी, दृष्टिभ्रम आदी विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित एकूण दहा विज्ञान खेळणी तयार केली. खेळणी तयार करताना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रयोगातून वैज्ञानिक संकल्पना समजून घेतल्या.

परिषदेच्या कार्यकर्त्या तथा विज्ञान अधिकारी शुभदा वकटे आणि विज्ञान विभाग प्रमुख चारुशीला जुईकर यांनी विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान खेळणी तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक खेळण्यामागील वैज्ञानिक संकल्पना व त्यामागील कार्यकारणभाव सोप्या आणि रंजक पद्धतीने समजावून सांगितला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून समजून घेण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा, निरीक्षणशक्ती आणि सर्जनशीलता विकसित होण्यास मदत झाली.

कृती सत्राच्या उद्घाटनप्रसंगी नेरूर केंद्राचे केंद्रप्रमुख गोविंद चव्हाण उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नंदिनी देशमुख, चेअरमन, नेरूर समृद्धी प्रतिष्ठान, तसेच खजिनदार राजीव नेरुरकर उपस्थित होते. यावेळी प्रिया कुबल, मनाली गर्जे, रश्मी राऊळ आणि मोरे मॅडम यांच्यासह शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल नेरूर, जि. प. शाळा नेरूर नं. १, नेरूर माणकादेवी, नेरूर शिरसोस आणि काळसे हायस्कूल या शाळांमधील एकूण ७७ विद्यार्थ्यांनी या कृती सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नंदिनी देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन अंकिता राणे आणि उज्वला निकम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य सौरभ पाटकर तसेच सर्व सहकारी शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.