राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत सिंधुदुर्गच्या मुक्ताई ॲकेडमीची दैदिप्यमान कामगिरी

सात खेळाडूंना पारितोषिके : राष्ट्रीय स्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वाढवला नावलौकिक 

सावंतवाडी: सातारा येथील विश्वगंगा प्रतिष्ठानतर्फे आयोजित दुसऱ्या ‘मकरंद आबा पाटील चषक’ राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धीबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतातील विविध राज्यांतून सुमारे ३७० खेळाडू सहभागी झालेल्या या स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या ९ पैकी ७ खेळाडूंनी पारितोषिके पटकावून राष्ट्रीय स्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला.

स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अव्वल राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने अत्यंत चुरशीच्या नऊ राऊंड्समध्ये ७ गुण मिळवून रेटिंग कॅटेगरीत तिसरा क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये ११ गुणांची वाढ झाली असून त्याला रोख पारितोषिक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.

इतर खेळाडूंमध्ये १३ वर्षीय हर्ष राऊळ याने साडेपाच गुणांसह १५ वर्षाखालील मुलांच्या गटात सहावा क्रमांक मिळवला आणि आपल्या आंतरराष्ट्रीय रेटिंगमध्ये १७ गुणांची भर घातली. १३ वर्षीय पुष्कर केळूसकर याने ५ गुणांसह १५ वर्षाखालील गटात पाचवा, तर १२ वर्षीय चिदानंद रेडकर याने दोन आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडूंवर मात करत ५ गुणांसह १३ वर्षाखालील गटात नववा क्रमांक पटकावला. देवगड येथील ७ वर्षीय बालखेळाडू आकाश वाटवे याने मोठ्या खेळाडूंवर विजय मिळवत साडेतीन गुणांसह ७ वर्षाखालील गटात तिसरा क्रमांक पटकावला.

मुलींच्या गटात राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच खेळणाऱ्या चारुल जाधव हिने साडेतीन गुणांसह १५ वर्षाखालील गटात आठवा, तर मोहीशा जाधव हिने ९ वर्षाखालील गटात तिसरा क्रमांक पटकावला. याशिवाय अथर्व वेंगुर्लेकर आणि तेजस वाटवे यांनीही उत्कृष्ट खेळ केला.

हे सर्व यश खेळाडूंनी मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर सर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवले. ॲकेडमीच्या उपाध्यक्षा स्नेहा पेडणेकर यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. खेळाडूंच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.