कोकण मराठी साहित्य परिषदेचे २०२४-२५ चे वार्षिक वाङ्मयीन व वाङमयेतर पुरस्कार जाहीर

सावंतवाडी । प्रतिनिधी :मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या ‘कोकण मराठी साहित्य परिषदेच्या’ (कोमसाप) वतीने दरवर्षी देण्यात येणारे सन २०२४-२५ या वर्षाचे वाङ्मयीन व वाङमयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने विहित कालावधीत मागवण्यात आलेल्या प्रस्तावांची मान्यवर व जाणकार परीक्षकांकडून छाननी करून हे पुरस्कार घोषित करण्यात आले.

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांना, तर कविता विभागात प्रथम क्रमांकाचा आरती प्रभू स्मृती पुरस्कार डॉ. दिलीप पांढरपट्टे व लेखिका विभागात स्नेहा फणसळकर यांना जाहीर झाला आहे.

घोषित करण्यात आलेल्या वाङमयीन पुरस्कारांमध्ये कादंबरी विभागात प्रथम क्रमांकाचा र. वा. दिघे स्मृती पुरस्कार विवेक गोविलकर यांच्या ‘सिंफनी’ तर द्वितीय क्रमांकाचा वि. वा. हडप स्मृती पुरस्कार उदय जोशी यांच्या ‘संघर्षपर्व’ या कादंबरीस मिळाला आहे. कथा विभागात प्रथम क्रमांकाचा वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार स्टिफन परेरा यांच्या ‘काळवेळ’ तर द्वितीय क्रमांकाचा विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार अशोक लोटणकर यांच्या ‘निराधार’ कथासंग्रहास घोषित झाला आहे. कविता विभागात प्रथम क्रमांकाचा आरती प्रभू स्मृती पुरस्कार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या ‘उडवाच मान माझी’ तर द्वितीय क्रमांकाचा वसंत सावंत स्मृती पुरस्कार विलास गावडे यांच्या ‘व्यक्त होतोय मी’ या कवितासंग्रहाला मिळाला आहे.

आत्मचरित्र विभागात प्रथम क्रमांकाचा धनंजय कीर स्मृती पुरस्कार आनंद इंदिरा श्रीधर सांडू यांच्या ‘क्षण सोनेरी – रुपेरी आणि काटेरी’ या संग्रहास, चरित्र विभागात श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार शामसुंदर गावकर यांच्या ‘भरती – ओहोटी’ या चरित्रास, समीक्षा विभागात प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार डॉ. शिल्पा जोशी यांच्या ‘मंगेश पाडगावकरांचे गीत – काव्य’ या ग्रंथास आणि नाटक विभागात भाई भगत पुरस्कार अरुण तुकाराम मोर्ये यांच्या ‘कृष्णा माझं काय चुकलं’ या नाटकास जाहीर झाला आहे. ललित गद्य विभागात प्रथम क्रमांकाचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार वर्षा कुवळेकर यांच्या ‘सफर खूबसुरत है मंजिलसे’ तर द्वितीय क्रमांकाचा सौ. लक्ष्मीबाई व माजी न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे स्मृती पुरस्कार नितीन तेंडुलकर यांच्या ‘अधिक उंच उडता उडता’ या साहित्यकृतीस घोषित झाला आहे. बालवाङमय विभागाचा प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांच्या ‘शशा रे सशा’ ग्रंथास मिळाला आहे. संकीर्ण विभागात प्रथम क्रमांकाचा वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार डॉ. विजयालक्ष्मी देवगोजी यांच्या ‘कातळशिल्पांच्या पाऊलखुणा’ तर द्वितीय क्रमांकाचा अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार रविराज गंधे यांच्या ‘महासागर’ ग्रंथास जाहीर झाला आहे. वैचारिक विभागाचा फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार रेखा कोरे यांच्या ‘महात्मा बसवेश्वर – कृतीतून प्रगतीकडे’ या ग्रंथास मिळाला आहे.

विशेष वाङमयीन पुरस्कारांमध्ये कादंबरी, कथासंग्रह व संकीर्ण विभागातील विशेष पुरस्कार अनुक्रमे ‘डंकी रूट’साठी प्रकाश पाटील, ‘ऍडजस्टमेंट’साठी मेघना साने आणि ‘तिमिरातून तेजाकडे’साठी डॉ. जिवबा केळुसकर यांना घोषित करण्यात आले आहेत. संपादन विभागातील विशेष पुरस्कार ‘वलयांकित चंद्र’साठी उज्ज्वला चंद्रशेखर धानजी आणि ‘आठवचित्रे’साठी प्रज्ञा जांभेकर यांना जाहीर झाले आहेत.

वाङमयेतर पुरस्कारांमध्ये कविता राजधानी पुरस्कार ठाण्याचे प्रसिद्ध कवी व गीतकार प्रविण दवणे यांना जाहीर झाला आहे. साहित्य, पर्यावरण व शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींसाठीचा कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार दहिसर येथील विद्याभूषण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक नर यांना, तर संपूर्ण कोकणातील योगदानासाठीचा श्री. बा. कारखानीस पुरस्कार मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनिल मुरारी तथा बंधू मयेकर यांना घोषित झाला आहे. गुरुवर्य अ. आ. देसाई स्मृती कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश आत्माराम मस्के व ठाणे जिल्हाध्यक्ष तुकाराम विठ्ठल तथा बाळ कांदळकर यांना मिळाला आहे. राजा राजवाडे स्मृती वाङमयीन कार्यकर्ती पुरस्कार मुंबईच्या पुष्पा कोल्हे व मालगुंड शाखेच्या शुभदा मुळ्ये यांना, तर वामनराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार मुंबई जिल्ह्यातील चेंबूर व रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा शाखेस जाहीर झाला आहे.

ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार रायगडच्या संध्या दिवकर व सिंधुदुर्गच्या स्नेहा फणसळकर यांना, महाविद्यालयीन लिहित्या विद्यार्थिनीसाठीचा सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार पालघरच्या संस्कृती महेंद्र तांडेल यांना, उमेदीच्या गुणवंत कवीसाठीचा कवी उमाकांत कीर स्मृती काव्य पुरस्कार मालगुंडच्या अमेय धोपटकर यांना आणि कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार ठाण्याचे प्रविण सोनावणे यांना जाहीर झाला आहे.

केंद्रीय स्तरावरील या पुरस्कारांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी व कवी डॉ. दिलीप पांढरपट्टे, सहकार क्षेत्रात २५ वर्षे कार्यरत असणारे व गेली ३० हून अधिक वर्षे कोमसापची चळवळ पुढे नेणारे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के आणि माणगाव वाचनालयाच्या अध्यक्षा व लेखिका स्नेहा फणसळकर या जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांना लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवले जाणार आहे. सर्व पुरस्कारप्राप्त विजेत्यांचे कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ व केंद्रीय कोषाध्यक्ष प्रकाश दळवी यांच्यासह संपूर्ण कोमसाप परिवाराने अभिनंदन केले आहे.