शृंगारतळी येथे भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न

गुहागर प्रतिनिधी:
तालुक्यातील शुंगारतळी येथे देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागवणारी भव्य तिरंगा रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. हातात अभिमानाने फडकणारा तिरंगा घेऊन नागरिक, युवक, युवति, शाळेचे विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. तिरंग्याच्या रंगांनी शृंगारतळी परिसर अक्षरशः उजळून निघाला होता. देशाच्या एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणाऱ्या या तिरंगा रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीमुळे शृंगारतळीमध्ये देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
विनायका पेट्रोल पंप ते निळकंठेश्वर मंदिर या परिसरामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली. पाटपन्हाळे हायस्कूलच्या पटांगणावर रॅलीची सांगता करण्यात आली. सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, माजी सभापती, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, उपनगराध्यक्ष प्रदिप बेंडल, सर्व नगरसेवक, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी, स्नेहा शिगवण, सुचिता घाणेकर, गुहागर नगराध्यक्ष निता मालप, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश कोळवणकर, अभय भाटकर, दिपक कनगुटकर, आशिष विचारे, विश्वास बेलवलकर आदींसह विविध स्तरातील राष्ट्रप्रेमी नागरीक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.