पुस्तकांच्या पालखीतून ज्ञानाची वारी; पनारे येथे उत्साहात ग्रंथदिंडी

 

मंदार विद्यालयाचा उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्याचा अभिनव प्रयत्न

 *पन्हाळा प्रतिनिधि* 

 *प्रतापसिंह काळे*

 

 

पनारे, ता. पन्हाळा : मोबाईल आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांचा पुस्तकांशी संवाद कमी होत असताना, ‘ग्रंथ माझा गुरु, ज्ञानाचा सागर’ हा संदेश देत पनारे (ता. पन्हाळा) येथील मंदार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रंथदिंडी व ग्रंथोत्सवाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थी, पुस्तकांची पालखी आणि वाचनसंस्कृतीचा जागर करीत गावातून काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.

कला शिक्षण प्रसारक मंडळ, मल्हारपेठ-सावर्डे संचलित मंदार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. सकाळी ग्रंथपूजन व पालखी सोहळ्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते पवित्र ग्रंथांचे पूजन, दीपप्रज्वलन करून ग्रंथपालखीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत ‘वाचनाची वाट… ज्ञानाची साथ!’ असा संदेश देत पनारे गावातून भव्य ग्रंथदिंडी काढली.

ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी तसेच विविध संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. हातात पुस्तके, वाचनसंस्कृतीचे संदेश आणि घोषवाक्ये घेत विद्यार्थ्यांनी गावातून जनजागृती केली.

 

त्यामुळे काही काळ पनारे गावातील वातावरण ज्ञानमय झाले.विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून ग्रंथालयासाठी १०० पुस्तके

या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने शाळेच्या ग्रंथालयासाठी तब्बल १०० पुस्तके खरेदी करण्यात आली असून त्यासाठी ११ हजार १४० रुपयांचा खर्च करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, मोबाईलच्या विळख्यातून त्यांचे लक्ष पुस्तकांकडे वळावे आणि ज्ञानाच्या विश्वाशी त्यांचा संवाद वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी शाळेत निवडक व दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शनही भरविण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तके पाहण्याची व त्यातून नवे ज्ञान मिळविण्याची संधी मिळाली.

शूर जवानांप्रती कृतज्ञतेची भावना विद्यालयाच्या सामाजिक उपक्रमांनाही यावेळी उजाळा देण्यात आला. गेल्या तीन वर्षांपासून विद्यालयातील विद्यार्थी सीमेवर देशसेवा बजावणाऱ्या जवानांसाठी राखी पाठविण्याचा उपक्रम राबवत आहेत. यंदाही विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत राख्या तयार केल्या असून त्या जवानांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे.मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला कला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. मारुतीराव परितकर, पनारे ग्रामपंचायतीचे सरपंच मा. श्री. मारुतीराव पाटील, केंद्रप्रमुख डी. के. पवार, मुख्याध्यापक अमरसिंह संघर्षी, सांस्कृतिक विभागप्रमुख आकांक्षा पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.‘वाचाल तर वाचाल, तरच पुढे जाल’ या संदेशातून विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ पुस्तक प्रदर्शन किंवा ग्रंथदिंडीपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात वाचनाची सवय रुजविण्याचा विद्यालयाचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.

 

 

*चौकट :*

ग्रंथदिंडी ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशातील विद्यार्थी, पारंपरिक पोशाख, पुस्तकांची पालखी आणि वाचनसंस्कृतीचा संदेश देणाऱ्या घोषणा यामुळे पनारे गावातून निघालेली ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. ‘ज्ञानाची वाट दाखविणाऱ्या पुस्तकांची पालखी प्रत्येक घरापर्यंत पोहोचावी’, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.