पाळणेकोंड ओवर फ्लो : सावंतवाडीचा पाणीप्रश्न मिटला

मुसळधार पावसामुळे नगरपरिषदेच्या मुख्य धरणाचे सर्व ६ दरवाजे उघडले 

सावंतवाडी:पावसाच्या हुलकावणीमुळे चिंतेत सापडलेल्या सावंतवाडीकरांसाठी अत्यंत दिलासादायक वृत्त समोर आले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचा मुख्य पाणीपुरवठा स्त्रोत असलेले पाळणेकोंड धरण आज पहाटे ३:४५ च्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. धरणाचे सर्वच्या सर्व सहा हायड्रोलिक दरवाजे ओव्हरफ्लो झाले असून, त्यातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. धरण जलमय झाल्यामुळे सावंतवाडी शहराचा आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटला आहे.

यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीला पावसाचे वेळापत्रक काहीसे अनिश्चित राहिल्याने धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नव्हता. परिणामी, धरणातील पाणीपातळी सुमारे एक मीटरने खालावली होती. ऐन पावसाळ्यात पाणीसाठा कमी झाल्याने आगामी काळात शहरात पाणीटंचाई निर्माण होते की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती आणि सावंतवाडीकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात मुसळधार आणि संततधार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आणि अखेर गुरुवारी पहाटे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले.

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पाळणेकोंड धरण ओव्हरफ्लो झाल्याची अधिकृत माहिती देत सावंतवाडीकरांना हा आनंदवार्ता दिली. शहराचा पाणीपुरवठा मुख्यत्वे याच धरणावर अवलंबून असल्याने धरण ओव्हरफ्लो झाल्याच्या बातमीने सावंतवाडीतील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.