सावंतवाडी बसस्थानकात सोन्याचे दागिने चोरणारे दांपत्य जेरबंद

१२ तोळ्यांचे दागिने जप्त करण्याची कारवाई सुरू

सावंतवाडी :
​ सावंतवाडी बसस्थानक परिसरातून १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या एका पुरुष आणि महिला आरोपीस सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार दाखल असलेल्या गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा छडा लावला. दीपक संतोष सकट (वय २७) आणि अमृता दीपक सकट (वय २१, दोघे रा. एस एम हायस्कूलमागे, किन्ई, कणकवली) अशी या प्रकरणातील संशयित आरोपींची नावे आहेत.

​तपासात निष्पन्न झाल्यानंतर सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ व त्यांच्या पथकाने आज दिनांक ६ नोव्हेंबर रोजी कणकवली तालुक्यातील गडनदी जवळील उभादेव मंदिर परिसरात सापळा रचून या दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांच्या खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरी केलेले १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने कर्नाटकमध्ये लपवून ठेवल्याची माहिती तपासात दिली आहे. दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी पूर्ण करून त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीचा ऐंशीत सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

​सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, महिला हवालदार रुपाली खानोलकर, हवालदार जॅकसन घोन्सलवीस आणि पोलीस अंमलदार अमर कांडर यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.