वीर माता-पिता व वीरपत्नींचा होणार सत्कार
सावंतवाडी । प्रतिनिधी : भारताच्या
८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून माजगाव येथे शहीद नौसैनिक शुभम उदय सावंत यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि शहिदांना आदरांजली अर्पण करण्याचा विशेष सोहळा शनिवार, १५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. माजगाव ग्रामपंचायतीच्या पटांगणावर सकाळी ११.०० वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार असून, या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वीरपत्नी आणि वीर माता-पिता यांचा विशेष गौरव व सत्कार करण्यात येणार आहे.
या गरिमापूर्ण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कारगिल युद्धात मोलाचे योगदान दिलेले निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा (मुख्य कार्यकारी अधिकारी – भोसले नॉलेज सिटी व कमांडंट – यशवंतराव भोसले सैनिक स्कूल) तसेच भारतीय सैन्याच्या आर्मी एअर डिफेन्स अंतर्गत ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये यशस्वी नेतृत्व केलेले निवृत्त सुभेदार मेजर (ऑनरेरी लेफ्टनंट) संजय लक्ष्मण सावंत हे उपस्थित राहणार आहेत. यासोबतच जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत आणि माजगाव गावातील सर्व माजी सैनिकांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
कै. शुभम उदय सावंत आणि कै. दीपक परशुराम सावंत यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रंजना रवींद्र कानसे, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सर्व सदस्य आणि समस्त माजगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.












