सीमेवरील सैनिकांना सावंतवाडीतील मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलतर्फे अनोखी भेट
सावंतवाडी । प्रतिनिधी : देशाची अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी प्राणपणाने कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपणारा एक अनोखा उपक्रम राबविला आहे. भारतीय टपाल खात्याच्या ‘एक राखी सैनिकांसाठी’ या उपक्रमांतर्गत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने अत्यंत आकर्षक राख्या तयार करून त्या सीमेवरील सैनिकांसाठी पाठविल्या आहेत.
आपण सर्वजण आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदाने सण साजरे करत असताना, देशाच्या सुरक्षेसाठी जवान मात्र सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. भारतीय जवानांच्या शौर्य, त्याग आणि समर्पणामुळेच देशातील नागरिक सुरक्षित आणि निर्धास्त जीवन जगू शकतात. याच भावनेतून सैनिकांप्रती जिव्हाळा, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी बहुविध रंगांच्या व आकर्षक कलाकुसरीच्या राख्या स्वतः तयार करून, त्यासोबत सैनिकांसाठी स्नेहमय शुभेच्छा आणि कृतज्ञता व्यक्त करणारे भावपूर्ण संदेशही पाठवले आहेत. या प्रेरक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, संवेदनशीलता, कृतज्ञता तसेच भारतीय सैनिकांविषयीचा विश्वास आणि आदर अधिक मजबूत होण्यास मदत झाली आहे.
हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी टपाल खात्याचे डाक सहाय्यक श्री भरत राऊळ आणि डाक कर्मचारी श्री विराज परब यांनी मार्गदर्शन केले, तर श्रीम. इंतिझिया फर्नांडिस, श्रीम. फरजाना मुल्ला व श्रीम. अर्चिता सुभेदार यांनी विशेष मेहनत घेतली.
विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद उपक्रमाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई, सह-संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य श्री जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघ कार्यकारी समितीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.












