ओणी- पाचल- अणुस्कूरा मार्गावरिल खड्डे भरण्यास सुरूवात

सार्वजनिक बांधकाम उपविभागाची तातडीने कार्यवाही

राजापूर प्रतिनिधी: तालुक्यातील ओणी पाचल अणूस्कुरा मार्गावर ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत ते खड्डे बुजविण्याचे काम गुरूवार पासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर यांच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. संबधित रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून जेएसबी मेटेरियलचा वापर करून भरून घेण्यात येत आहेत. तशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर यांच्या वतीने देण्यात आली आहे.
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंडीजवळ रस्ता वाहतुकीसाठी धोक्याचा बनल्याने प्रवाशांच्या सुरक्षेस्तव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाट मार्गे जाणारी वाहतुक ही राजापूर तालुक्यातील ओणी पाचल अणुस्कूरा मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा ताण वाढला असून अगोदरच खड्डेमय असलेला हा रस्ता आणखी खड्डयात गेला आहे. मात्र या मार्गावरिल वाढती वाहतुक लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर यांनी तातडीने या रस्त्यावरिल खड्डे बुजवावेत अशी मागणी होत होती. आंबा घाट बंद असल्याने एसटी सह अन्य खासगी वाहतुकदारही आता ओणी पाचल अणूस्कुरा मार्गाचाच वापर करू लागले आहेत. मात्र मुळातच काहीसा अरुंद असलेला रस्ता, त्यात रस्त्यावर पडलेले खड्डे यात वाहतुकीचा प्रचंड ताण वाढल्याने या रस्त्याची आणखी दुरावस्था होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडूनही तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. ओणी पाचल मार्गावरिल खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ हाती घेण्यात आले आहे. गुरूवार पासून या मार्गावर असलेले खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन रस्त्याच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देण्यावर भर दिला जाणार असल्याचे बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे.
या रस्त्यावर वाढलेला वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन बांधकाम विभागाने चांगल्या प्रकारे खड्डे भरून घ्यावेत, कारण गणेशोत्सव काळात या मार्गवर आणखी वाहतुक वाढणार असून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी बांधकाम विभागाने घ्यावी अशी मागणी होत आहे.