हर घर तिरंगा अभियानांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल लांजा येथे रंगली आकर्षक रांगोळी स्पर्धा

लांजा (प्रतिनिधी): स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा येथे विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना रंगांची सुंदर साथ देत विविध आकर्षक रांगोळ्या साकारल्या.

स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि देशप्रेमाची भावना आपल्या कलाकृतीतून व्यक्त करत विद्यार्थ्यांनी तिरंगा, भारतमाता, स्वातंत्र्यसैनिक, देशभक्तीपर संदेश तसेच राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणाऱ्या विविध रांगोळ्या साकारल्या. सुबक रचना, रंगसंगती आणि आशयपूर्ण मांडणीमुळे शाळेचा परिसर रंगीबेरंगी आणि देशभक्तीमय झाला.

या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कलात्मकतेला आणि कल्पनाशक्तीला वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये देशप्रेम, राष्ट्रीय अभिमान आणि स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व यांची जाणीव अधिक दृढ झाली.

स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.जवळपास २०० विद्यार्थी -विद्यार्थीनींनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेत आपल्या कलाकृतींमधून ‘देश प्रथम’ हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित केला. उत्कृष्ट रांगोळ्यांची निवड करून विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.