देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने मोकाट गुरांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने नव्याने उभारण्यात आलेल्या गुरांच्या कोंडवाड्याचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी उत्साहात करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांनी फीत कापून कोंडवाड्याचे उद्घाटन केले.
सिंधुदुर्गातील मोकाट गुरांच्या समस्येवर पहिला प्रयोग
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या संपूर्ण टीमने, विशेषतः स्वच्छता सभापती बुवा तारी यांच्या पुढाकारातून हा कोंडवाडा उभारण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने मोकाट गुरांसाठी अशा प्रकारचा कोंडवाडा उभारण्याचा हा पहिला महत्त्वाचा प्रयोग आहे.
मोकाट गुरांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील समस्या कशा पद्धतीने सोडवता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली आहे. नगरपंचायत व नगरपालिका स्तरावर अशा कोंडवाड्यांची उभारणी करण्यास प्रोत्साहन देतानाच ग्रामीण भागातील मोकाट गुरांच्या समस्येसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही पुढाकार घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मोकाट गुरांमुळे नागरिकांही धोका
मोकाट गुरांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून रस्त्यांवरील अपघातांचाही धोका वाढला आहे. नुकताच गुरांमुळे ग्रामीण भागात मोठा अपघात झाल्याचा संदर्भ देत पालकमंत्री राणे यांनी नागरिकांनीही या विषयात जबाबदारीने भूमिका घेण्याचे आवाहन केले.
कोंडवाड्यात आणण्यात येणाऱ्या गुरांना अन्न, चारा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर नियमानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येणार असून गोशाळांच्या संपर्कात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व संबंधित टीम असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुरे बाहेरून आणून सोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
देवगड तालुक्यात बाहेरून गुरे आणून रस्त्यांवर सोडली जात असल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित मालकांची नावे प्रशासनाकडे तसेच पोलिसांकडे असल्याचे सांगितले. गुरांची जबाबदारी संबंधित मालकांनी स्वीकारली पाहिजे. अन्यथा प्रशासनाला जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
नागरिकांनी आणि गुरांच्या मालकांनी जबाबदारीने वागल्यास पुढील कठोर कारवाई टाळता येऊ शकते. मात्र मोकाट गुरांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असेल तर प्रशासन आवश्यक त्या ठिकाणी कठोर भूमिका घेईल, असे पालकमंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
नगरपंचायतीचे पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, मुख्याधिकारी हरीदत्त माने, माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, स्वच्छता सभापती बुवा तारी, पाणीपुरवठा सभापती तनवी चांदोस्कर,शरद ठुकरूल, बांधकाम सभापती रोहन खेडेकर, नगरसेवक योगेश चांदोसकर, वैभव कळंगुटकर, दयानंद पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस, अॅड. प्रसाद करंदीकर, गणपत गावकर, सिद्धेश माणगावकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












