टोपीवाला हायस्कूलची भव्य ‘वंदे मातरम्’ तिरंगा रॅली

साडेसहाशे विद्यार्थ्यांनी साकारला देशभक्तीचा सोहळा

‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला;

शिस्तबद्ध नियोजनातून राष्ट्रप्रेमाचा जागर

‘वंदे मातरम्’च्या सार्धशताब्दी वर्षाच्या सांगता सोहळ्या निमित्त आयोजन

अमित खोत | मालवण :

‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात टोपीवाला हायस्कूल, मालवणच्या साडेसहाशे विद्यार्थ्यांनी मालवण शहरातून भव्य ‘वंदे मातरम्’ तिरंगा रॅली काढत देशभक्तीचा जागर केला. ‘वंदे मातरम्’ गीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या सार्धशताब्दी वर्षाच्या सांगता सोहळ्यानिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी तिरंग्याच्या तीन रंगांचे पोशाख परिधान करून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभाग घेतला. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या या रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचेही भान जपले. मार्गात कुठेही कचरा किंवा कागद न टाकता त्यांनी शिस्तीचे आणि सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण घालून दिले. त्यामुळे टोपीवाला हायस्कूलची शिस्त व विद्यार्थ्यांचे कौतुक विशेष ठरले.

भारताची राजमुद्रा तसेच तिरंग्याची आकर्षक प्रतिकृती चित्रकला शिक्षक बी. जी. सामंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारली.

‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नसून स्वातंत्र्यलढ्यातील पराक्रम, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहे. या गीताचा इतिहास आणि त्याचे महत्त्व डॉ. ज्योती तोरस्कर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

या रॅलीची संकल्पना मुख्याध्यापक वळंजू सर यांच्या मार्गदर्शनाखाली साकारली, तर नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख महेश धामापूरकर यांनी केले. शिस्तबद्ध नियोजनातून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि सामाजिक जबाबदारीचा प्रेरणादायी संदेश दिला.