देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय येथे भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती, ग्रंथ दिन आणि शालेय विद्यार्थी सभासद योजनेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन आणि स्व. डॉ. एस. आर. रंगनाथन यांना अभिवादन करून करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी यांनी भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री स्व. डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे ग्रंथालयशास्त्र आणि ग्रंथालय चळवळीतील योगदानाची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
न्यू इंग्लिश स्कूल, देवरुखमधील शालेय विद्यार्थी सभासद योजनेतील सहभागी ९४ विद्यार्थी-विद्यार्थिनीना वाचनालयाकडून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी आणि न्यू इंग्लिश स्कूल, देवरुखच्या उपशिक्षिका विद्या खाडे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाच्या महत्त्वाबाबत मार्गदर्शन केले. न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मधुकर कोकणी यांनी सभासद नोंदणीसाठी उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल, तर उपशिक्षिका विद्या खाडे आणि शाळेचे ग्रंथपाल वरद तांबे यांनी वाचनालयासाठी विद्यार्थी सभासद करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल वाचनालयाच्यावतीने आभार मानण्यात आले.
सभासद करण्याची ही प्रक्रिया यापुढेही चालू राहणार असल्याचे अध्यक्ष प्रा. जोशी यांनी सांगितले. यावेळी काही विद्यार्थिनींनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि वाचनालयाचा जास्तीतजास्त उपयोग करून आमचे वाचन समृद्ध करू असे सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. अमित कुलकर्णी, सल्लागार मंडळ सदस्य आणि सर्व कर्मचारी वृंदाचे उत्तम सहकार्य लाभले. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी सभासदांना पुस्तक वितरणही केले गेले. आठवड्यातून एकदा ग्रंथालय कर्मचारी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना पुस्तके बदलून देणार असल्याचे ठरले. डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती, ग्रंथ दिन आणि शालेय विद्यार्थी सभासद योजना शुभारंभ या संयुक्त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वाचनालयाच्या ग्रंथपाल श्रद्धा आमडेकर यांनी केले.












