चिपळूण (प्रतिनिधी) : घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, लवेल येथे दि. १० ते १२ ऑगस्ट २०२६ दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता व त्यामध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या स्पर्धेतून मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय टेबल टेनिस संघासाठी घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, लवेल येथील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
पार्थ मनोज शिंदे आणि अथर्व विक्रम भोसले या दोन्ही विद्यार्थ्यांची कोकण विभागीय संघात निवड झाली असून, ते आगामी विद्यापीठ स्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत कोकण विभागाचे नेतृत्व/प्रतिनिधित्व करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील व रजिस्ट्रार संदीप मुनघाटे यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा देत, त्यांनी अशीच उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचे तसेच कोकण विभागाचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या निवडीबद्दल महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून पार्थ शिंदे व अथर्व भोसले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.












