अति उत्कृष्ट सेवेसाठी ६, उत्कृष्ट सेवेसाठी ७ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव; जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल
सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट व निष्कलंक सेवेसाठी जाहीर करण्यात आलेल्या पदकांमध्ये सिंधुदुर्ग पोलीस दलाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन मुरलीधर दहिकर यांच्यासह एकूण १३ अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट व अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याने सिंधुदुर्ग पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२५ वर्षांहून अधिक काळ निष्कलंक सेवा बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी राजेश रमेश भागवत, रापोनि रामदास नागेश पालशेतकर, श्रेपोउनि संजय पुंडलिक साटम, श्रेपोउनि वासुदेव विश्वनाथ वरवडेकर, सपोफौ भालचंद्र मोहन दाभोळकर आणि सपोफौ डॉमनिक संतान डिसोजा यांचा समावेश आहे.
तसेच १५ वर्षांहून अधिक काळ उत्कृष्ट व निष्कलंक सेवा बजावल्याबद्दल उत्कृष्ट सेवा पदकासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन मुरलीधर दहिकर, पोनि प्रवीण अशोक कोल्हे, पोहवा राकेश रविंद्र कडुलकर, पोहवा प्रमोद बाळकृष्ण काळसेकर, पोहवा किरण कृष्णा देसाई, पोहवा बस्त्याव पेद्रु डिसोजा आणि पोहवा राहुल शिवाजी काळे यांची निवड झाली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या या सन्मानामुळे सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि जनतेसाठी समर्पित कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मिळालेल्या या गौरवामुळे जिल्हा पोलीस दलात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून पदक विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












