कुडाळमध्ये ‘नमो उद्यान’चा लोकार्पण सोहळा उद्या

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सांगिर्डेवाडीत उद्घाटन

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीतील सांगिर्डेवाडी येथे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत साकारण्यात आलेल्या ‘नमो उद्यान’चा लोकार्पण सोहळा शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या उद्यानाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

कुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीतील सांगिर्डेवाडी येथील सर्व्हे नं. ६८, हि. नं. २ (६९) येथे हे ‘नमो उद्यान’ साकारण्यात आले आहे. नागरिकांना विरंगुळा, मनोरंजन तसेच परिसराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या उद्यानामुळे सांगिर्डेवाडी परिसराला नवी ओळख मिळणार आहे.

या कार्यक्रमास लोकसभा सदस्य नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार दीपक केसरकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार प्रमोद जठार आणि आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तसेच जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा सह आयुक्त नगरविकास विभाग विनायक औंधकर यांच्यासह मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

नगराध्यक्ष प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे तसेच मुख्याधिकारी खंडू पवळ यांच्या निमंत्रणाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, कुडाळ नगरपंचायतीच्या सर्व सन्माननीय सदस्यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

या लोकार्पण सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.