हिंदू म्हणून एकत्र या आणि अखंड भारताचे स्वप्न सत्यात उतरवा : ना. नितेश राणे

अखंड भारत संकल्प दिनी स्वा.सावरकर नाट्यगृहात पार पडली हिंदू सकल समाजाची जाहीर सभा
रत्नागिरी | प्रतिनिधी :
अखंड भारताचे स्वप्न आपल्याला सत्यात उतरवायचे असेल तर त्याची जबाबदारी हिंदू समाजाने आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे,  यामुळे हिंदू म्हणून एकत्र या आणि अखंड भारताचे स्वप्न सत्यात उतरवा असे आवाहन प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते ना. नितेश राणे यांनी रत्नागिरीत केले.
अखंड भारत संकल्प दिन निमित्ताने ना. नितेश राणे हे आज रत्नागिरीत आले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीत बाईक रॅली काढण्यात आली. त्यानंतर स्वा. सावरकर नाट्यगृहामध्ये हिंदू सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर सकल हिंदू समाजाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी बोलताना ना. नितेश राणे म्हणाले रत्नागिरीत आल्यावर भगवे वातावरण पाहायला मिळाले याचे समाधान आहे. स्वा. सावरकर यांच्या नावाने असलेल्या या नाट्यगृहात मी आज उभा आहे, खांद्यावर तुम्ही दिलेली भगवी शाल आहे. पण आज इथे उभा असताना मी फक्त हिंदू म्हणून उभा आहे आणि ती ओळख मला जास्त मोलाची आहे. आज अखंड भारत संकल्प दिवस आहे, आपला स्वप्नातील असा भारत उभा करताना, आधी आताच्या भारतात जे घडते आहे त्याकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. या देशात ८० ते ९० टक्के हिंदू आहेत, म्हणजे हे राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे, आधी इथे हिंदूंच्या हिताचाच विचार झाला पाहिजे. सर्वधर्मसमभाव, भाईचारा या गोष्टी अन्य धर्मीय देशात दिसत नाहीत, मग बहुल हिंदू देशात तरी का असाव्यात असा प्रश्न ना. नितेश राणे यांनी उपस्थित केला. या भारतात राहताना, ज्यांना आमचे वंदे मातरम मंजूर नाही, आमचा तिरंगा ज्यांना मान्य नाही, त्यांना या देशात राहण्याचा कोणताच अधिकार नाही असे स्पष्ट शब्दात बोलताना  प्रखर हिंदुत्वनिष्ठ  नेते नितेश राणे म्हणाले, एकीकडे देश हिताच्या गोष्टींना विरोध करायचा आणि दुसरीकडे मोदी सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा हा दुतोंडीपणा करणाऱ्यांबद्दल आता कडवी भूमिका हिंदू म्हणून आपण घेतली पाहिजे आणि अखंड भारताचा विचार करताना याही गोष्टीचा विचार होणे गरजेचे आहे, याच साठी हिंदू म्हणून आपण एकत्र आले पाहिजे असे ते म्हणाले.
आज जिहादी लोकांना येथे इस्लामी राष्ट्र बनवायचे आहे म्हणून पद्धतीशीरपणे आपल्या हिंदू धर्माला बदनाम करायला सुरुवात केली आहे, याचसाठी राम मंदिर, श्री सिद्धीविनायक मंदिर यासारखे विषय पुढे काढत आहेत, हे षडयंत्र ओळखा. आपण संख्येने जास्त आहोत, एकत्र आलो तर जिहादींपैकी कोणीही राहणार नाही म्हणून हिंदू म्हणून एकत्र या आणि अखंड भारताचे स्वप्न साकार करण्याचे स्वप्न सत्यात उतरवा व ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्या असे आवाहन ना. नितेश राणे यांनी केले.