संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त १९ व २० ऑगस्टला भरगच्च सामाजिक उपक्रमांचे आयोजन

दशावतारी नाटक आणि सुपारी रोप वाटपाचा समावेश : सह्याद्री फाउंडेशनतर्फे आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी: सह्याद्री फाउंडेशनचे माजी अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या १९ व २० ऑगस्ट रोजी सावंतवाडीत विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची अधिकृत माहिती सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊत व अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी दिली.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला सचिव प्रताप परब, ॲड. संतोष सावंत, प्रल्हाद तावडे, सुनील खानोलकर, तारकेश सावंत, अशोक सांगेलकर, विजय चव्हाण, प्रमोद सावंत, हर्षवर्धन धारणकर, सुहास सावंत, गजानन बांदेकर, विभावरी सुकी, संदीप सुकी आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

या उपक्रमांतर्गत १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७:०० वाजता सावंतवाडी येथील गोविंद चित्रमंदिर येथे पारंपरिक दशावतार कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, कसई-दोडामार्ग यांचा ‘कृष्ण हनुमान युद्ध’ हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे. याच कार्यक्रमादरम्यान सायंकाळी ८:३० वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सह्याद्री फाउंडेशनच्या सदस्यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा पार पडेल. याप्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींसह माजी नगराध्यक्ष संजू परब आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी विजय चव्हाण यांचा विशेष नागरी सत्कार व गौरव केला जाणार आहे.

पर्यावरण बचाव अभियानांतर्गत वृक्ष संवर्धन व जतन या उद्देशाने माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये ‘एक झाड लावण्याची अभिनव कल्पना’ रुजवण्यासाठी २० ऑगस्ट रोजी रोप वाटप उपक्रम राबवला जाईल. यानुसार सकाळी १०:३० वाजता कलंबिस्त हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना १०० सुपारीची रोपे वाटली जातील, तर दुपारी १२:०० वाजता कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयात १०० सुपारीच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.

सह्याद्री फाउंडेशनतर्फे आयोजित या सर्व सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा आणि कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.