विद्यार्थ्यांनी केवळ पदव्या न घेता तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हावे: ना. उदय सामंत
रत्नागिरी: आजचे युग हे तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे (IT) आहे. अशा काळात आपल्या भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक संगणक शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि शालेय अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे आहे. रत्नागिरीतील तरुण पिढीने केवळ पदव्या न मिळवता तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हावे, जेणेकरून त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतील, असा विश्वास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांनी व्यक्त केला.
रत्नागिरीतील विष्णुपंत जोगळेकर संकुल, दामले शाळेजवळ ‘स्मार्ट स्टडी’ व ‘आकॉनिक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट’च्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या प्रसंगी उपस्थित राहून ना. उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू होत असलेल्या या नवीन शैक्षणिक उपक्रमाला मनापासून शुभेच्छा दिल्या.
उपस्थितांशी संवाद साधताना ना. सामंत पुढे म्हणाले की, संचालक श्री. प्रशांत सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा जो स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. हे इन्स्टिट्युट रत्नागिरीतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचे आणि मोलाचे पाऊल ठरेल.
या सोहळ्याला ‘स्मार्ट स्टडी’ व ‘आकॉनिक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट’चे संचालक श्री. प्रशांत सावंत, त्यांचे सर्व सहकारी, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













