प्रभारी अधिकारी म्हणून शशांक नाईक यांनी स्वीकारला पदभार
सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांच्या बदलीनिमित्त निरोप व सत्कार समारंभ, तसेच नूतन प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशांक नाईक यांचा स्वागत सोहळा कुडाळ येथील रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. श्री. हजारे यांची मुंबई ग्रंथालय संचालनालयाच्या दुर्मिळ ग्रंथालय विभागात ग्रंथालय अधिकारी म्हणून बदली झाली असून, रत्नागिरीचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशांक दीनानाथ नाईक यांच्याकडे सिंधुदुर्गचा अतिरिक्त प्रभारी कार्यभार सोपवण्यात आला आहे.
सत्काराला उत्तर देताना सचिन हजारे म्हणाले, “सिंधुदुर्ग वासियांनी मला भरभरून प्रेम दिले असून, हीच माझ्या पुढच्या वाटचालीची शिदोरी आहे. साडेपाच वर्षांच्या कार्यकाळात ग्रंथालयांचे नुकसान होईल असे काम कधीही माझ्या हातून घडले नाही. मुंबईत बदली झाली असली, तरी सिंधुदुर्गातील ग्रंथालयांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन.” नूतन प्रभारी अधिकारी शशांक नाईक यांनीही जिल्ह्यात ग्रंथालय चळवळ अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के यांनी हजारे यांच्या प्रामाणिक व संयमी कार्याचा गौरव केला. जिल्ह्यातील ११८ ग्रंथालयांच्या संस्थाचालक व कर्मचाऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते, असे ते म्हणाले. याप्रसंगी माजी अध्यक्ष विठ्ठल पाटणकर यांच्या हस्ते सचिन हजारे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला, तर शशांक नाईक यांचे स्वागत मंगेश मस्के यांनी केले.
या सोहळ्याला संघाचे सचिव राजन पांचाळ, उपाध्यक्ष धाकु तानावडे, रुजारियो पिंटो, वाचनालयाचे कार्यवाह डॉ. विवेक पाटणकर, ॲड. संतोष सावंत, संजय वेतुरेकर, महेश बोवलेकर, प्रवीण भोगटे, सौ. प्रतिभा पाटणकर, संजय शिंदे, शिवानंद प्रभू, देवदत्त चुबे, सिताराम परब, सदानंद तावडे, सतीश गावाडे, गुरुनाथ मडवळ, जयेंद्र तळेकर, प्रसाद दळवी आणि दीक्षा परब यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रंथालय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजन पांचाळ यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संचालक ॲड. संतोष सावंत यांनी केले.













