सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपोषण स्थळी भेट आणि पाठिंबा
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ला गॅस सर्व्हिसेसच्या (घरगुती गॅस वितरण एजन्सी) लूटमारी व हुकूमशाही कारभाराविरुद्ध तात्काळ कडक कारवाई करणे या विषयासाठी आज स्वातंत्र्य दिनी पीडित गॅस धारकांनी वेंगुर्ले तहसील कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी या उपोषणास भेट देऊन आपला पाठिंबा दिला आहे.
पीडित गॅस धारकांनी विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, तहसीलदार, पोलीस ठाणे यांना देऊन सदर कारवाई १५ ऑगस्ट पूर्वी करावी अशी लेखी मागणी केली होती. मात्र ही कारवाई न झाल्याने आज सकाळपासून वेंगुर्ले तहसील कार्यालयासमोर पीडित गॅसधारकांनी आपले उपोषण सुरू केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने ग्राहक उपोषणात सहभागी झाले होते. दरम्यान नागरिकांचे उपोषण असल्याचे पाहून सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपोषणास भेट देऊन आपला पाठिंबा दिला. यावेळी नवनाथ सातार्डेकर, नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप तालुका अध्यक्ष पप्पू परब, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, नगरसेवक सुषमा प्रभूखानोलकर, रवी शिरसाट, प्रशांत आपटे, गौरी पाटील, रिया केरकर, लीना म्हापणकर, आकांक्षा परब, शितल आंगचेकर, समिधा रेडकर, काजल कुबल, गौरी माईणकर, प्रीतम सावंत, प्रणव वायंगणकर, सुधीर पालयेकर, सदानंद गिरप, युवराज जाधव, विनय नेरुरकर, सचिन शेट्ये तसेच पंचायत समिती सदस्य संकेत धुरी, तुषार साळगावकर, शिवसेना शहर प्रमुख अजित राऊत, विशाल सावळ, वसंत तांडेल, मनवेल फर्नांडिस, संतोष सावंत, प्रार्थना हळदणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनी भेट देत आपला पाठिंबा दिला.
वेंगुर्ला तालुक्यातील पीडित गॅस धारक यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, वेंगुर्ला येथील ‘वेंगुर्ला गॅस सर्व्हिसेस’ या एजन्सीच्या अत्यंत मुजोर, बेकायदेशीर आणि ग्राहकांची उघड आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या कारभाराकडे प्रशासनाने लक्ष वेधावे. सदर गॅस एजन्सीने सर्वसामान्य नागरिकांना, गोरगरिबांना आणि महिला भगिनींना नाहक मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. आमचे दैनंदिन जगणे कठीण करणाऱ्या मुख्य तक्रारी मध्ये हक्काच्या घरपोच (Home Delivery) सेवेचा बोजवारा. ग्राहकांकडून घरपोच सेवेचे शुल्क वसूल करूनही वेळेत गॅस दिला जात नाही. एजन्सीने घरपोच सेवा देण्यास पूर्णपणे टाळाटाळ चालवली असून, ग्राहकांना स्वतः चकरा मारण्यास भाग पाडले जात आहे, ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर नियमानुसार ठराविक दिवसांत गॅस सिलिंडर ग्राहकांच्या दारात पोहोचला पाहिजे. मात्र, महिना-महिना बुकिंग करूनही सिलिंडर न देणे म्हणजे एजन्सीची निव्वळ मुजोरी आहे. ग्राहकांनी रीतसर ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता, ग्राहकांना अंधारात ठेवून बुकिंग परस्पर रद्द केले जाते. हा ग्राहकांच्या अधिकारांवर गदा आणणारा डिजिटल गैरव्यवहार आहे. आपल्या हक्काच्या गॅसबद्दल विचारणा करण्यास गेलेल्या ग्राहकांना, महिलांना या एजन्सीचा उद्धट मालक आणि त्याचे कर्मचारी अत्यंत अपमानास्पद व गुंडप्रवृत्तीची वागणूक देतात.
तसेच ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता, गॅस सुरक्षा तपासणी किंवा गॅस पाईप/रेग्युलेटर बदलण्याच्या नावाखाली शेकडो रुपयांची सक्तीची बेकायदेशीर वसुली केली जाते. पैसे न दिल्यास गॅस जोडणी तोडण्याची किंवा गॅस न देण्याची उघड धमकी ग्राहकांना दिली जाते. रांगेत उभे राहून गॅस घेताना ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती आणि महिलांसाठी कोणतीही स्वतंत्र किंवा सन्मानजनक व्यवस्था एजन्सीकडे उपलब्ध नाही. त्यांना तासनतास उन्हात उभे करून त्यांचा छळ केला जातो, जो अत्यंत निषेधार्ह आहे.
गॅस गोदामातून वाहनांमध्ये सिलिंडर भरताना किंवा वाहतूक करताना सुरक्षेच्या कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. रहिवासी भागात असुरक्षित पद्धतीने गॅस हाताळला जात असून, यामुळे वेंगुर्ल्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला सर्वस्वी एजन्सी जबाबदार राहील. या मुजोर गॅस एजन्सी ला वठणीवर आणण्यासाठी आपल्या स्तरावरून तात्काळ कडक प्रशासकीय कारवाईचे आदेश व्हावेत, हीच आमची अपेक्षा आहे.













