संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक गुरुदास मठकर यांच्यातर्फे शाळा नं. ४ मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
सावंतवाडी । प्रतिनिधी : आजच्या डिजिटल युगात मोबाईल हे संपर्काचे प्रभावी साधन असले तरी लहान मुलांच्या हातात आलेला मोबाईल त्यांच्या भवितव्यासाठी धोकादायक ठरत आहे. मोबाईल हा मुलांच्या हातात मिळालेला राक्षस असून या राक्षसाच्या आहारी गेल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे मुलांनी शक्यतो वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत मोबाईलचा वापर टाळावा, असे परखड आवाहन सकल मराठा समाज व सकल हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांनी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला माजी नगरसेवक गुरुदास मठकर यांनी येथील पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ४ मध्ये आयोजित केलेल्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोबाईलच्या अतिवापराबाबत पालक आणि विद्यार्थ्यांना अत्यंत परखड शब्दांत इशारा दिला.
आज अनेक पालकांमध्ये एक-दोन वर्षांच्या मुलांच्या हातातही मोबाईल देण्याची सवय दिसत असून ही सवय अत्यंत घातक आहे. सुरुवातीला मुलाला शांत करण्यासाठी दिलेला मोबाईल पुढे त्याच्या व्यसनाचा भाग बनतो. मोबाईलवरील रील्स, गेम्स आणि सोशल मीडिया यांच्या अतिवापरामुळे मुलांचा अभ्यास, एकाग्रता आणि प्रत्यक्ष सामाजिक संवादावर गंभीर परिणाम होत आहे. काही मुले आई-वडिलांशी संवाद साधण्यापेक्षा मोबाईलच्या आभासी जगात रमणे अधिक महत्त्वाचे मानतात. ही परिस्थिती पालकांनी वेळीच ओळखण्याची गरज असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले.
मुलांच्या हातात मोबाईल देणे म्हणजे त्यांना डिजिटल जगाचे दार उघडून देणे आहे, पण त्या दारातून काय आत येत आहे यावर पालकांचे नियंत्रण असायला हवे. संपर्कासाठी मोबाईल आवश्यक असेल तर सोशल मीडिया, रील्स आणि अनावश्यक अॅप्स नसलेला साधा मोबाईल वापरता येईल. मात्र मुलांचे बालपण आणि शिक्षण मोबाईलच्या पडद्यामागे हरवू देऊ नका, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच पालकांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज असून मुलांसमोर सतत मोबाईलवर रील्स पाहत बसण्याची सवय सोडावी, कारण मुले पालकांचेच अनुकरण करतात. त्यामुळे मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी घरातील मोठ्यांनीच सुरुवात केली पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी सीताराम गावडे यांनी माजी नगरसेवक गुरुदास मठकर यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम कौतुकास्पद असून यापूर्वी आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शंभर सायकलींचे वाटप केले होते. समाजासाठी काहीतरी देण्याची दानशूर वृत्ती त्यांच्यात असून अशी माणसे समाजात दुर्मिळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुलांना मोबाईल नव्हे तर पुस्तक द्या, रील्स नव्हे तर संस्कार द्या आणि आभासी जग नव्हे तर वास्तवातील स्वप्ने दाखवा, तरच भावी पिढी खऱ्या अर्थाने घडेल असे आवाहन त्यांनी शेवटी केले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, नगरसेविका सीमा नाईक, सुनील नाईक, नीता विर्नोडकर यांच्यासह मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते.













