चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या सावर्डे जिल्हा परिषद गटातील कर्तृत्ववान शेतकऱ्यांचा गौरव सोहळा सावर्डे येथील आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती सौ. पूजा निकम यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सन २०२३)’ प्राप्त प्रगतिशील शेतकरी अनंत खांबे (मांडकी), महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या राज्यस्तरीय नाचणी पीक स्पर्धेतील जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त धाकटू गावकर (ढोक्रवली) तसेच राज्यस्तरीय नाचणी पीक स्पर्धेतील तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त आत्माराम पुनवत (दहिवली खुर्द) यांचा यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रगतिशील शेतकरी अनंत खांबे म्हणाले की, “शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून ती विज्ञान, नियोजन आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांचा संगम आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून दर्जेदार उत्पादन वाढविल्यास शेती अधिक समृद्ध होऊ शकते. प्रत्येक शेतकऱ्याने नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी.” आ. शेखर निकम यांनी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “राज्यातील प्रगतिशील शेतकरी हे कृषी क्षेत्राचे खरे प्रेरणास्थान आहेत. आधुनिक शेती, जलसंवर्धन, पीक विविधीकरण आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेती अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांच्या कार्यातून इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल आणि शेती अधिक समृद्ध होण्यास निश्चितच मदत होईल. सौ. पूजा शेखर निकम यांनी सांगितले की, शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मेहनती, प्रयोगशील आणि कष्टाळू शेतकऱ्यांचा सन्मान करणे म्हणजे शेतीचा सन्मान होय. नव्या पिढीने शेतीकडे आधुनिक व्यवसाय म्हणून पाहावे. आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनाच्या माध्यमातून शेती अधिक सक्षम करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे.
सावर्डे जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या उत्पादनात तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या वापरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल शासनस्तरावर घेण्यात आली आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि प्रयोगशीलतेला मिळालेली ही पोचपावती असून, अशा शेतकऱ्यांचा सार्वजनिक सन्मान केल्याने इतर शेतकऱ्यांनाही नवी प्रेरणा मिळणार आहे. या गौरव सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित यशवंतराव, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला शेतकरी, शेतकरी बांधव तसेच महेश घाग, किशोर घाग, देवराज गरगटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याबरोबरच सावर्डे परिसरातील शेती, शेतकरी आणि कृषी क्षेत्रातील नव्या प्रयोगांना प्रोत्साहन देण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.













