युवकाचा शोध सुरू

दोडामार्ग : प्रतिनिधी
तिलारी नदीच्या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात घोटगेवाडी कॉजवे परिसरातून वाहून गेलेल्या ८ वर्षीय रेगण दिलीप बडा या चिमुड्याचा मृतदेह अखेर दुसऱ्या दिवशी सापडला आहे. घोटगे कॉजवे शेजारी त्याचा मृतदेह रेस्क्यू टीमला आढळून आला. बेपत्ता युवकाचा शोध अद्याप सुरूच आहे.
सोमवारी सायंकाळी तिलारी नदीत कालव्याचे पाणी अचानक सोडल्याने घोटगेवाडी पुलावरून वेगवान पाण्याच्या प्रवाहात रेगण बडा याच्यासह अनुरंजन किसपोट्टा बिजापन्नी (वय २५) हे दोघे वाहून गेले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि प्रशासनाने तातडीने शोधमोहीम सुरू केली. सोमवारी रात्री अंधार पडल्यामुळे ही मोहीम थांबवण्यात आली होती. मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले.
या शोधकार्यात दोडामार्गचे तहसीलदार राहुल गुरव यांनी स्वत: रेस्क्यू टीमसोबत पाण्यात उतरून सहभाग घेतला. नदीचा वेगवान प्रवाह आणि वाढलेली पाण्याची पातळी असतानाही बचाव पथकाने धोकादायक परिस्थितीत शोधमोहीम राबवली. अखेर रेगणचा मृतदेह रेस्क्यू पथकाच्या हाती लागला. दरम्यान, २५ वर्षीय अनुरंजन याचा अद्याप कोणताही शोध लागलेला नसून बचाव पथकाकडून त्याचा शोध घेण्याचे काम अजूनही सुरूच आहे.












