राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी उपजिल्हाप्रमुख
दोडामार्ग : प्रतिनिधी
दोडामार्ग शिवसेना तालुका प्रमुख पदी पुन्हा एकदा गणेशप्रसाद गवस यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील राजेंद्र निंबाळकर व शैलेश दळवी यांची उप जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती जाहीर झाली करण्यात आली. जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली आहे.
विद्यमान तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांची तालुकाप्रमुख पदी फेरनिवड करण्यात आली. गणेशप्रसाद गवस यांची पक्षाप्रती असलेली तळमळ व गावागावांत शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी केलेली कामगिरी लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठी व जिल्हाप्रमुख संजू परब यांनी परत एकदा गवस यांनाच संधी दिली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तसेच नगरपंचायत निवडणुकीत गवस यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना ही संधी दिल्याचे पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आगामी निवडणुकांत सर्वांना सोबत घेऊन पक्षासाठी आवश्यक ते सर्व काम केले जाईल. तालुक्यात पक्ष एक नंबरवर कसा येईल याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार असल्याचे गणेशप्रसाद गवस यांनी स्पष्ट केले.
शैलेश दळवी यांची उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती
शिवसेनेच्या जिल्हा समन्वयक पदावर काम केलेल्या शैलेश सुरेश दळवी यांची पक्षाने आता उपजिल्हाप्रमुख पदी बढती दिली आहे. तसेच राजेंद्र निंबाळकर यांचीही उपजिल्हाप्रमुख पदी फेरनियुक्ती देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात पक्षासाठी जोमाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तिन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.












