घोटगेवाडी कॉजवे दुर्घटना: २१ तासांच्या अथक शोधानंतर ६ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह हाती; तरुण अजूनही बेपत्ता

​नदी ओलांडण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; संतप्त ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणावर तीव्र निषेध

​दोडामार्ग | सुहास देसाई

​घोटगेवाडी येथील कॉजवेवरून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलेल्या दोघांपैकी रेगण दिलीप बडा या ६ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह तब्बल २१ तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर सापडला आहे. तर त्याच्यासोबत वाहून गेलेला अनुरंजन किसपोट्टा हा तरुण अद्याप बेपत्ता असून सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.

​आईने खाऊसाठी दिलेले पैसे आणि दुर्दैवी घटना
घोटगेवाडी येथे राहणारे परप्रांतीय अनुरंजन हे चिमुकल्या रेगणला घेऊन कोनाळकट्टा येथे आले होते. रेगणच्या आईने त्याला खाऊ आणण्यासाठी पैसे दिले होते आणि तो दुकानावर आला होता. कॉजवेवर पाण्याचा प्रवाह तुडुंब वाढलेला असतानाही त्या तरुणाने पलीकडे जाण्याचा कयास लावला आणि चिमुकल्यासह पाण्यात उतरला.
​पाण्यात उतरताच मुलाचा पाय खोलवर गेला. त्याला सावरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने तो वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी तरुणानेही नदीपात्रात उडी घेतली, मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने दोघेही वाहून गेले. यावेळी प्रत्यक्षदर्शी काही जण व्हिडिओ बनवत होते तर काही पाण्याचा प्रवाह पाहून थांबले होते.

​अथक शोधमोहीम आणि धरणाचा विसर्ग बंद

घटनेची माहिती मिळताच तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी दाखल झाले, परंतु काळोखामुळे पहिल्या दिवशी मोहीम थांबवावी लागली. मंगळवारी सकाळी ‘सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम (सांगेली-आंबोली)’ बोटींसह घटनास्थळी दाखल झाली. शोधमोहिमेस अडथळा येऊ नये म्हणून तिलारी मुख्य धरण आणि तेरवण मेढे उन्नैयी बंधाऱ्याचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला होता. अखेर दुपारी २:४५ वाजता घोटगे पुलाजवळ रेगणचा मृतदेह हाती लागला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

​दरम्यान, धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा विसर्ग करणे अनिवार्य असल्याचे जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता गजानन बुचडे यांनी स्पष्ट केले आहे.

​कार्यकारी अभियंत्यांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामस्थ आक्रमक
एवढी मोठी शोकांतिका घडूनही तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील घटनास्थळी फिरकले नाहीत आणि फोनलाही प्रतिसाद दिला नाही. आपत्तीच्या काळात जबाबदार अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार वर्तनामुळे ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​शाळेत शोकाकुल वातावरण
मृत रेगणने यंदाच घोटगेवाडी येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला होता नियतीने साधलेल्या या घातामुळे बडा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.