मोबाईल शोधण्यासाठी इमर्जन्सी चेन ओढली

कोकणकन्या एक्सप्रेस हळवल फाटकात २० मिनिटे थांबली

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला ब्रेक

हळवल रेल्वे फाटकात वाहनांच्या लांबच लांब रांगा

कणकवली : रेल्वे प्रवासादरम्यान एका प्रवाशाचा मोबाईल खाली पडल्याने तो शोधण्यासाठी प्रवाशाने इमर्जन्सी चेन ओढल्याची घटना घडली. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी कोकणकन्या एक्सप्रेस कणकवली येथील हळवल रेल्वे फाटक परिसरात थांबली. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

मोबाईल शोधण्यासाठी इमर्जन्सी चेन ओढण्यात आल्याने कोकणकन्या एक्सप्रेस सुमारे २० मिनिटे हळवल रेल्वे फाटकात थांबून होती. गाडी थांबल्याने रेल्वे फाटक बंद राहिले आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांची काही काळ मोठी गैरसोय झाली. दरम्यान, रेल्वे थांबल्याने हळवल रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. या ठिकाणी पूल उभारण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात आली. वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हळवल रेल्वे फाटकाला पर्यायी व्यवस्था करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. सुमारे २० मिनिटांच्या विलंबानंतर कोकणकन्या एक्सप्रेस पुन्हा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि हळूहळू रेल्वे फाटकावरील वाहतूकही सुरळीत झाली.