चिपळूण (प्रतिनिधी) : खेर्डी ग्रामपंचायतमध्ये आज मंगळवार दि.१८ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंद्रथ खताते, ज्येष्ठ नेते अनिल दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांची तंटामुक्त अध्यक्षपदी सूचक रवि फाळके व अनुमोदन प्रकाश साळवी यांनी देऊन एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.दिशा दाभोळकर, माजी पंचायत समिती सदस्य नितीन(अबुशेठ) ठसाळे, प्रकाश साळवी, अजित खताते, माजी तंटामुक्ती अध्यक्ष हरिश्चंद्र यादव, उपसरपंच अभिजीत खताते, माजी उपसरपंच प्रसाद सागवेकर, ग्रामपंचायत सदस्य राकेश दाभोळकर, रियाज खेरटकर, राजेश सुतार, सचिन मोहिते रविंद्र फाळके, विनोद खताते, सौ.शांती कुंभार, सचिन ठसाळे, गणेश भुरण, सचिन भोसले, अजय जाधव, स्वप्नील कुंभार, साईराज सावंत, भिमराव पवार, ईक्बाल खेरटकर, तन्वीर खेरटकर, मुबारक चौगुले, मगबुल सकवारे, शुभम खताते सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
व्यवसायाच्या क्षेत्रात कार्यरत असलेले श्री.जाधव हे शांत, संयमी, हसतमुख आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आदर करणे, प्रत्येकाशी समजूतदारपणे वागणे आणि प्रामाणिकपणा जपणे ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये मानली जातात. विशेष म्हणजे,ज्या व्यक्तीचा स्वभावच शांतताप्रिय आणि संयमी आहे. त्यांची तंटामुक्त अध्यक्षपदी झालेली निवड हा एक आगळावेगळा योगायोग मानला जात आहे. आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या वाद-विवादापासून दूर राहिलेल्या श्री.जाधव यांच्याकडे गावातील तंटे सामोपचाराने सोडवून सामाजिक सलोखा निर्माण करण्याची जबाबदारी आता आली आहे. जाधव यांचे सुशिक्षित, संयमी आणि सकारात्मक व्यक्तिमत्त्व पाहता त्यांच्या नेतृत्वाखाली खेर्डी गावात तंटामुक्तीच्या माध्यमातून शांतता, सलोखा आणि सामाजिक एकोपा अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री.यादव यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.राजेंद्र जाधव यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.खेर्डी गावाची संवेदनशील ओळख बदलून गावाचे नाव उंचावण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.गावात शांततामय आणि सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे,यासाठी नवनिर्वाचित अध्यक्षांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राजेंद्र जाधव यांच्या निवडीमुळे खेर्डी गावाच्या सामाजिक ऐक्याला नवी दिशा मिळेल, अशी आशा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.













