चिपळूणमधील वाशिष्ठीसह जिल्ह्यातील नद्यांचा गाळ काढण्यासंदर्भात बैठक; नाम फाउंडेशनच्या सहकार्याने कामांना गती देण्याचे पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांचे निर्देश

आठ दिवसात ‘नाम’ ला कार्यारंभ आदेश

चिपळूण (प्रतिनिधी): चिपळूणमधील वाशिष्ठी नदीसह जिल्ह्यातील इतर प्रमुख नद्यांमधील गाळ काढण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज चिपळूण येथील शासकीय विश्रामगृहात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. नाम फौंडेशनच्या माध्यमातून गाळ काढण्याचा यावेळी निर्णय झाला. आठ दिवसात तसा कार्यारंभ आदेश देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यातील इतर नद्यांमधील गाळ उपसा प्रक्रियेला गती देण्याबाबतही यावेळी निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, नाम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात आदींसह नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.

वाशिष्ठी नदीतून केवळ गाळ काढणे हाच उद्देश न ठेवता, भविष्यात या नदीपात्रात वॉटर स्पोर्ट्स आणि पर्यटन सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगून पालकमंत्री डाॕ सामंत म्हणाले, त्यादृष्टीने नदीपात्रातील बेट त्याचाही गाळ काढावा. प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रियेत जाणारा वेळ वाचवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाम फाउंडेशनला गाळ काढण्याचे काम देण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यासंदर्भात येत्या आठ दिवसांत सामंजस्य करार, कार्यारंभ आदेश देवून तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिले.

जिल्ह्यातील इतर नद्यांचा समावेश
वाशिष्ठीसोबतच जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, काजळी, अर्जुना या नद्यांमधील गाळ काढण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली. तसेच, प्रत्येक मतदार संघातील अंतर्गत नद्यांमधील गाळ काढण्यासाठी स्थानिक स्तरावर सर्वेक्षण करून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
कमी खर्चात तिप्पट काम
नाम फाउंडेशनच्या माध्यमातून प्रती घनमीटर ३१ रुपये दराने गाळ उपसा केला जाणार असल्याने, शासकीय दराच्या तुलनेत कमी खर्चात तिप्पट गाळ काढणे शक्य होणार आहे. यामुळे भविष्यातील संभाव्य पूर परिस्थिती आणि पाणी टंचाईवर मात करण्यास मोठी मदत होणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या बैठकीमुळे चिपळूणवासियांना संभाव्य पुराच्या धोक्यातून मोठा दिलासा मिळणार असून, जिल्ह्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला मोठी गती मिळणार आहे.