तात्काळ खुलासा करण्याचे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना लेखी आदेश
राजापूर प्रतिनिधी : राजापूर तालुका पंचायत समितीच्या अखत्यारित असलेल्या एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाचा अनागोंदी कारभाराची दखल गटविकास अधिकारी रोहित कुंभार यांनी घेतली आहे. या विभागात निधी खर्चात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस व पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्यावरून या प्रकरणी तात्काळ खुलासा करावा असे लेखी आदेश गटविकास अधिकारी कुंभार यांनी एकात्मिक बालविकास विभागाच्या प्रभारी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले आहेत. तशी माहिती गटविकास अधिकारी कुंभार यांनी दिली आहे.
या प्रकरणी उपसभापती गुरव यांनी घेतलेली कठोर कारवाईची भूमिका व गटविकास अधिकारी यांनी दिलेले खुलाशाचे आदेश यामुळे या विभागात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतुन होत आहे.
राजापुरातील पंचायत समितीच्या अखत्यारित असलेल्या एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या एकूण्च अनागोंदी कारभारा विरोधात उपसभापती अभिजित गुरव यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. जनतेतुनही त्यांच्या या भूमिकेचे स्वागत होत आहे. या विभागात घरघंटी वाटपातील अनियमितता चर्चेत असतानाच दुसरा प्रकार गुरव यांनी पुढे आणला. ७ ऑगस्ट रोजी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक बैठकीत उपसभापती अभिजित गुरव यांनी या विभागाच्या या मनमानीची आणि अनागोंदी कारभाची लक्तरे वेशीवर टांगली होती. अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणासाठी व उत्कृष्ठ कार्यपध्दतीसाठी पंचायत समिती सेस व जिल्हा परिषद सेस अनुदानातुन दहा टक्के रक्कम या विभागासाठी राखीव ठेवली जाते. यातुन या विभागाने ही प्रशिक्षणे घ्यावयाची आहेत, तर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यातुन क्रमांक काढून बक्षिसही द्यायचे आहे. पंचायत समित व जिल्हा परिषद अशा दोन्ही विभागांतील या सेस अनुदानातुन राखीव रक्कम यावर खर्च करताना यासाठी दोन वेगवेगळे कार्यक्रम घ्यावयाचे आहेत. तसे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. तसे असतानाही या विभागाने एकच कार्यक्रम घेतला व ३१ मार्च २०२६ रोजी या एकाच कार्यक्रमाची दोन वेगवेगळी बिले काढून ती मंजूर करून घेतली व रक्कम खर्च दाखविली.
या विरोधात गुरव यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित करताच त्याची दखल घेत गटविकास अधिकारी कुंभार यांनी या विभागाच्या प्रकल्प विकास अधिकारी यांना तात्काळ लेखी पत्र देत याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी काय खुलासा सादर केला जातो याकडे लक्ष लागून राहिले आहेत.
मात्र अशा प्रकारे या विभागाने एकच कार्यक्रम घेऊन दोन बिले खर्ची टाकून रक्कम लाटल्याने या विभागाच्या एकूणच कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर गटविकास अधिकारी नक्की काय कारवाई करतात की हे प्रकरण गुंडाळले जाते याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.













