भांबेडचे पोलीस पाटील वसंत शिवगण यांचा प्रामाणिकपणा रस्त्यात सापडलेले पैशाचे पाकीट मालकाला केले परत

लांजा (प्रतिनिधी): रस्त्यात सापडलेले पैशाचे पाकीट मालकाला परत करून भांबेड गावचे पोलीस पाटील वसंत शिवगण यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लांजा तालुक्यातील भांबेड गावचे पोलीस पाटील असलेले वसंत शिवगण १५ ऑगस्ट रोजी काही कामानिमित्त संगमेश्वर येथे गेले होते. यावेळी त्यांना रस्त्यामध्ये पैशाचे पाकीट सापडले होते. सदरचे पाकीट हे संगमेश्वर येथीलच भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले अनिल टोलू पवार (वय ५८) यांचे होते. ते दिनांक १५ ऑगस्ट रोजी प्रवास करीत असताना साडवली संगमेश्वर येथे हरवले होते.
सदरचे पाकीट हे अनिल पवार यांचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज लांजा पोलीस ठाण्यात त्यांना ते परत देण्यात आले. तर पोलीस पाटील वसंत शिवगण यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल भांबेड परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.