सावंतवाडीत ‘तिरंगा दौड’ मॅरेथॉन स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावनेसोबत फिटनेसचीही जाणीव!
सावंतवाडी । प्रतिनिधी : आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांना शिक्षणासोबतच फिटनेसचीही अत्यंत गरज आहे आणि ‘तिरंगा दौड’ सारख्या मॅरेथॉन स्पर्धा त्या गरजा पूर्ण करतात, असे मत हर घर तिरंगा उपक्रमाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी येथे व्यक्त केले. दरम्यान, भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चांगले अधिकारी घडावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही ते म्हणाले.
सिंधुदुर्ग भाजप व महिंद्रा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर ‘तिरंगा दौड’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण जिल्ह्यातून साडेचारशेहून अधिक स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन संदीप गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या स्पर्धेत मोठ्या गटातून प्रथमेश जाधव आणि मेघा सातपुते यांनी प्रथम क्रमांक पटकावला. लहान गटात मुलांमध्ये दीप सावंत आणि मुलींमध्ये सौम्या मेस्त्री यांनी विजयाचा मान मिळवला. लहान गटातील मुलांमध्ये यश कडव आणि पृथ्वीराज राठोड यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तर मुलींमध्ये आस्था लिंगवत आणि मैथिली गावडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.
तर मोठ्या गटात मुलांमध्ये प्रणव भालेकर याने द्वितीय, तर प्रशांत सुद्रिक याने तृतीय क्रमांक मिळवला. याच गटातील मुलींमध्ये रेश्मा पांढरे हिने द्वितीय आणि समीक्षा वर हिने तृतीय क्रमांक पटकावला.
*स्पर्धेमुळे मुलांना राष्ट्रभावनेची जोड*: *संदीप गावडे*
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना संदीप गावडे यांनी सांगितले की, अशा मॅरेथॉन स्पर्धांमुळे मुलांना राष्ट्रभावनेची जोड मिळण्यासही मदत होते. स्पर्धा परीक्षांमध्ये आपण काहीसे मागे आहोत, परंतु नियमित सराव आणि अशा स्पर्धांमुळे या क्षेत्रातही चांगली प्रगती करता येईल. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक युवक-युवतीने भविष्यात आर्मी, वन विभाग किंवा इतर सरकारी विभागांमध्ये चांगले अधिकारी बनण्याचे ध्येय बाळगावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि मेडल्स देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य पंकज पेडणेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, जिल्हा बँकेचे संचालक रवी मडगावकर, कझ्युमर्स सोसायटीचे चेअरमन प्रमोद गावडे, महिंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर, सावंतवाडी भंडारी समाजाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, सिंधुदुर्ग डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, दिलीप भालेकर, नयना साळगावकर, अनिकेत आसोलकर, किसन धोत्रे, अभिषेक लाखे, आपा राऊळ, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, युवा कार्यकर्ते अनिकेत आसोलकर, गेळे सरपंच सागर ढोकरे आणि कौस्तुभ मुंडये आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले, तर आभार महेंद्र पेडणेकर यांनी मानले.












