वेंगुर्ले येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयात देवनागरी सुलेखन कार्यशाळा संपन्न…

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ला येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने आणि श्रीमती सुशीलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. सुनील नांदोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवसीय देवनागरी सुलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सुंदर हस्ताक्षर व सुलेखन कलेचे महत्त्व अधोरेखित करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना या कलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.

चार दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन वनस्पतीशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. धनश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. सुनील नांदोसकर, डॉ. मनीषा मुजुमदार यांच्यासह सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. सुनील नांदोसकर यांनी सुलेखन ही आत्मसात करण्यासारखी सुंदर आणि सर्जनशील कला असल्याचे सांगितले. हस्ताक्षर आणि सुलेखन अर्थात कॅलिग्राफी या दोन स्वतंत्र संकल्पना असून, सुलेखनामध्ये अक्षरांचे सौंदर्य, प्रमाणबद्धता, रचना, वळण आणि मांडणी यांना विशेष महत्त्व असते, असे त्यांनी स्पष्ट केले. चार दिवसांच्या कालावधीत सुलेखनाची मूलभूत तत्त्वे समजून घेत प्रत्यक्ष सरावाच्या माध्यमातून ही कला कशी आत्मसात करता येईल, याबाबत त्यांनी सहभागींचे मार्गदर्शन केले.

कार्यशाळेदरम्यान सुलेखनासाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे स्ट्रोक कशा पद्धतीने द्यावेत, अक्षरांची ठेवण आणि रचना कशी असावी, देवनागरीतील अक्षरलेखन कोणत्या पद्धतीने करावे, अक्षरांमध्ये योग्य प्रमाणबद्धता कशी राखावी तसेच अक्षरलेखनामध्ये सौंदर्य आणि कलात्मकता कशी साधावी, याचे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी डॉ. मनीषा मुजुमदार यांनी सुलेखन कार्यशाळा आयोजित करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात लेखनासाठी विविध डिजिटल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सुंदर हस्ताक्षर आणि सुलेखनाच्या कलेचे महत्त्व काहीसे मागे पडत चालले आहे. असे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी तन्मय शितोळे, सारा प्रभू, प्रा. सुरेखा धुरी, प्रीती वाडकर, केतकी वेंगुर्लेकर, उल्हास सामंत आणि स्वराज्य गायकवाड यांनी कार्यशाळेतील आपले अनुभव मनोगतातून व्यक्त केले.
समारोप कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांनी सुलेखनामुळे व्यक्तिमत्त्व विकासास मोठी मदत होते, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमात डॉ. बी. जी. गायकवाड यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले, तर डॉ. मनीषा मुजुमदार यांनी आभार मानले.