आडाळी एमआयडीसीत ४ हजार कोटींचा सोलार प्रकल्प : उद्योगमंत्री उदय सामंत

दोन हजार रोजगार निर्मितीसह ४७ उद्योजकांना प्लॉट्स उपलब्ध

सुमारे दीड ते २ हजार स्थानिक तरुणांना मिळणार प्रत्यक्ष रोजगार

​सावंतवाडी:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगांच्या माध्यमातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असून, दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी येथे तब्बल ४ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा सोलार पॅनल निर्मिती प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) झाला असून, त्याद्वारे सुमारे १,५०० ते २,००० स्थानिक तरुणांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. याशिवाय, जागेअभावी अडचणीत सापडलेल्या ४७ उद्योजकांनाही आडाळी एमआयडीसीत प्लॉट्स देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली.

​सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या विकासाचे अत्यंत सकारात्मक वातावरण असून उद्योग आणि आरोग्य क्षेत्रात मोठे प्रकल्प मार्गी लागत आहेत. कालच ‘ताज’ ग्रुपसोबत सामंजस्य करार पार पडला, तर आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा होऊन त्यांचे स्वप्न साकार होत आहे. आडाळी एमआयडीसीमध्ये सोलार प्लांटसह अनेक नव-नवीन उद्योग येत असून, आगामी काळात उद्योजकांची मागणी आणि गरज लक्षात घेऊन या एमआयडीसीचे विस्तारीकरण करण्याची ग्वाहीदेखील उद्योगमंत्र्यांनी दिली.

​आडाळीत होणारा ४ हजार कोटींचा हा भव्य प्रकल्प प्रामुख्याने सोलर पॅनल तयार करण्याचा असणार आहे. या एकाच मोठ्या प्रकल्पाच्या माध्यमातून १५०० ते २००० रोजगार निर्माण होणार आहेत. याचबरोबर, गेल्या काही काळापासून जागेअभावी खोळंबलेल्या ४७ स्थानिक उद्योजकांची अडचण दूर करत त्यांना प्रत्येकी एक याप्रमाणे ४७ प्लॉट्स वाटप करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या ४७ सूक्ष्म व मध्यम उद्योगांच्या माध्यमातून आणखी १,२०० ते १,५०० लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. एकूणच आडाळी एमआयडीसीच्या या नव्या वाटचालीमुळे दक्षिण कोकणातील औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.