खेड (प्रतिनिधी) : सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, पशुप्रेम आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राधाई फाउंडेशन, चिपळूणच्या संस्थापक अध्यक्षा सौ. राधाताई लवेकर यांना राज्यस्तरीय ‘रणरागिणी पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. जनकल्याण सामाजिक सेवा संस्था, कोल्हापूर यांच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष श्री. उदयसिंह पं. पाटील यांच्या हस्ते राधाताई लवेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध सामाजिक क्षेत्रांत सातत्याने आणि निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानाचा गौरव व्हावा, तसेच त्यांच्या कार्याला समाजासमोर प्रेरणादायी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय ‘रणरागिणी पुरस्कार’ प्रदान केला जातो.
राधाताई लवेकर यांनी चिपळूण परिसरात सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबविले आहेत. मोकाट व संकटात सापडलेल्या जनावरांचे संरक्षण, रेस्क्यू आणि त्यांची सेवा करण्याबरोबरच महिला जनजागृती, सामाजिक न्याय, पर्यावरण संवर्धन आणि गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या सेवाभावी कार्यातून समाजातील विविध घटकांना मदतीचा हात मिळाला आहे.
पशुप्रेम आणि प्राणी संरक्षणाच्या क्षेत्रातही राधाई फाउंडेशनच्या माध्यमातून राधाताई लवेकर यांनी उल्लेखनीय काम उभे केले आहे. संकटात सापडलेल्या प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविणे, जखमी व मोकाट जनावरांच्या बचावासाठी पुढाकार घेणे तसेच नागरिकांमध्ये प्राणी संरक्षणाबाबत जनजागृती करणे, अशा विविध उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
महिला सक्षमीकरण आणि सामाजिक जनजागृतीच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविणे आणि गरजू व्यक्तींना आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
या विविधांगी सामाजिक कार्याची दखल घेत राधाताई लवेकर यांची ‘रणरागिणी पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर राधाताई लवेकर यांनी हा सन्मान केवळ आपला नसून राधाई फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि चिपळूणकर नागरिक यांच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव असल्याची भावना व्यक्त केली. समाजहितासाठी यापुढेही अधिक जोमाने आणि सातत्याने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राधाताई लवेकर यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल चिपळूण परिसरातील विविध सामाजिक संस्था, पत्रकार, मान्यवर, स्वयंसेवक आणि नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या कार्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.













