गावातील गुणवंत विद्यार्थी, महिला आणि कर्मचाऱ्यांचा ध्वजारोहणाचा मान देऊन गौरव
राजापूर वार्ताहर: तालुक्यातील गोवळ गावचे सरपंच अभिजीत कांबळे यांनी आपल्या कार्यकाळात एक अनोखी आणि आदर्श परंपरा सुरू केली आहे. गावातील गुणवंत विद्यार्थी, कर्तृत्ववान महिला आणि प्रामाणिक शासकीय कर्मचारी यांना स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याचा मान देऊन त्यांचा गौरव केला जात आहे. या उपक्रमाचे राजापूर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
गावातील मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून इयत्ता १० वी आणि १२ वी मध्ये प्रथम आलेले विद्यार्थी, स्कॉलरशिप, नवोदय, नासा आणि इस्रोमध्ये निवड झालेले विद्यार्थी, तसेच डॉक्टर, इंजिनिअर, वकील आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सरपंचांऐवजी ध्वजारोहणाचा मुख्य मान दिला जातो. तर गावातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी २६ जानेवारी रोजी सामाजिक, लघु उद्योग, शैक्षणिक, राजकीय आणि बचत गट क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सौ. अर्चना अनंत वारेशी यांना ध्वजारोहणाचा बहुमान देण्यात आला.
या वर्षीच्या १५ ऑगस्ट रोजी गावाच्या विकासात आणि आरोग्यात मोलाचे योगदान देणाऱ्या ग्रामसेविका श्रीमती भक्ती संदीप पवार आणि आशा सेविका श्रीमती पायल प्रसाद खंडे यांना संयुक्तपणे ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला. सुट्टीच्या दिवशीही पूर्णवेळ गावासाठी काम करणाऱ्या या महिला कर्मचाऱ्यांच्या पाठीवर गावाने कौतुकाची थाप दिली आहे.
सरपंच अभिजीत कांबळे यांनी आपली ही परंपरा यशस्वीपणे पूर्ण केली असून, आगामी काळात येणाऱ्या नवीन सरपंचांनीही गावाचा विकास आणि नागरिकांना प्रेरणा देणारा हा चांगला उपक्रम पुढे सुरू ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.हा उपक्रम इतर गावांसाठीही मार्गदर्शक ठरत असून, आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ या अनोख्या उपक्रमाचे आणि सरपंच कांबळे यांचे विशेष कौतुक करत आहेत.













