गिरोबाची कोंड येथे बंधाऱ्याचे काम पूर्ण; घोटगे ग्रामस्थांना मोठा दिलासा!

भूजल पातळीत वाढ होण्यासह शेती व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार; लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे ग्रामस्थांकडून आभार

स्वप्निल कदम -कुडाळ : 

तालुक्यातील घोटगे गावातील गिरोबाची कोंड येथे बंधाऱ्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, यामुळे गावातील जलसंधारणाला मोठी चालना मिळणार आहे. उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई कमी होण्यासह भूजल पातळीत वाढ होऊन शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटण्यास दिलासा मिळणार असल्याने ग्रामस्थ व शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

दुष्काळी परिस्थितीत घोटगे गावासाठी हा बंधारा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पावसाचे पाणी अडवून त्याचा योग्य विनियोग होण्यास मदत होणार असल्याने शेतीच्या दृष्टीनेही या कामाचे विशेष महत्त्व आहे. बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या कामासाठी सहकार्य व पाठपुरावा करणारे खासदार, पालकमंत्री, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी यांचे घोटगे ग्रामस्थांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच या कामासाठी योगदान देणारे प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित यंत्रणेचेही ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

लोकप्रतिनिधींचे सहकार्य, प्रशासनाचा पुढाकार आणि ग्रामस्थांच्या एकजुटीतून जलसंधारणाचे हे काम पूर्णत्वास आले असून, आगामी काळात घोटगे गावाच्या पाणीप्रश्नावर सकारात्मक परिणाम घडविणारा हा बंधारा ठरणार आहे.