मोकाट गुरांविरोधात मालवण नगरपरिषदेची कारवाई मोहीम 

मालवण | प्रतिनिधी : शहरातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच वाहतुकीला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन मालवण नगरपरिषदेने मोकाट गुरांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

 

या मोहिमेदरम्यान नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील विविध भागांत फिरणाऱ्या मोकाट गुरांना पकडून ताब्यात घेतले. रस्त्यांवर गुरांचा वावर वाढल्याने वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. अपघाताची शक्यता लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई करण्यात येत आहे.

मोकाट गुरे रस्त्यावर सोडणाऱ्या पशुमालकांनी आपल्या जनावरांची योग्य ती व्यवस्था करावी. गुरे सार्वजनिक ठिकाणी मोकाट सोडल्यास नगरपरिषदेच्या नियमानुसार संबंधित पशुमालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.

 

शहरातील स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता यांना प्राधान्य देत ‘स्वच्छ, सुंदर व सुरक्षित मालवण’ या उद्देशाने मोकाट गुरांविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.