गैरव्यवहार करणाऱ्या प्रभारी प्रकल्प अधिकाऱ्यांची बदली करा
राजापूर प्रतिनिधी: राजापूर तालुका पंचायत समितीच्या अखत्यारित असलेल्या एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या अनागोंदी कारभाराची मर्यादा ही केवळ एका बिलापुरती मर्यादित नसुन या विभागाच्या मागील पाच वर्षाच्या कामकाजाची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी उपसभापती अभिजित गुरव यांनी केली आहे. तर या विभागात कार्यरत असणाऱ्या प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची तात्काळ या पदावरून बदली करावी अशीही मागणी गुरव यांनी केली आहे.
या विभागात निधी खर्चात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्यावरून या प्रकरणी तात्काळ खुलासा करावा असे लेखी आदेश गटविकास अधिकारी रोहित कुंभार यांनी एकात्मिक बालविकास विभागाच्या प्रभारी प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या प्रकरणी उपसभापती गुरव यांनी आता केवळ या एका बिलापुरती ही चौकशी मर्यादित न ठेवता या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या विभागाचा कारभार गेली १३ वर्षापेक्षा अधिक काळा हा प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती आहे. त्यामुळे अनेक योजनांच्या अंमलबजावणीबाबत या विभागाकडून सावळा गोंधळ सुरू असतो. त्यामुळे या विभागाच्या मागिल पाच वर्षाच्या आणि खास करून प्रशासकिय राजवटीच्या काळात झालेला खर्च आणि केलेल्या कामांची चौकशी व्हावी अशी मागणी गुरव यांनी केली आहे.
तर अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणासाठी व उत्कृष्ठ कार्यपध्दतीसाठी पंचायत समिती सेस व जिल्हा परिषद सेस अनुदानातुन दहा टक्के रक्कम या विभागासाठी राखीव ठेवली जाते. यातुन या विभागाने ही प्रशिक्षणे घ्यावयाची आहेत, तर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यातुन क्रमांक काढून बक्षिसही द्यायचे आहे. पंचायत समित व जिल्हा परिषद अशा दोन्ही विभागांतील या सेस अनुदानातुन राखीव रक्कम यावर खर्च करताना यासाठी दोन वेगवेगळे कार्यक्रम घ्यावयाचे आहेत. तसे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. तसे असतानाही या विभागाने एकच कार्यक्रम घेतला व ३१ मार्च २०२६ रोजी या एकाच कार्यक्रमाची दोन वेगवेगळी बिले काढून ती मंजूर करून घेतली व रक्कम खर्च दाखविली या प्रकरणाची चौकशी करताना संबधित प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी यांची या पदावरून तात्काळ उचलबांगडी करावी व सखोल चौकशी करावी अशी मागणी गुरव यांनी केली आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैद्येही रानडे यांची भेट घेऊन आपण या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे गुरव यांनी सांगितले.













