२० सप्टेंबर रोजी विलवडे रेल्वे स्थानकासमोर लाक्षणिक उपोषण
लांजा (प्रतिनिधी) :विलवडे रेल्वे स्टेशनवर जोपर्यंत एक्सप्रेस ट्रेन ला थांबा मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही, तसेच रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी २० सप्टेंबर रोजी विलवडे रेल्वे स्थानकासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्याचा निर्धार
विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेच्या बैठकीत काण्यात आला.
विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेची बैठक १९ ऑगस्ट २०२६ रोजी विलवडे येथे संपन्न झाली. विलवडे रेल्वे स्टेशनवर मागणी केलेल्या सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, दुसऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात यावी,सुसज्ज वेटिंग रूम, पथदीप, स्टेशनवर येणारा रस्ता, अपंग व जेष्ठ नागरिकांसाठीचा असलेला रस्ता व त्यावरील काळोख ,खेड ते सावंतवाडी लोकल, प्रवासी शेड, स्वच्छता या व इतर मागण्यांसाठी प्राथमिक स्वरूपात निवेदन देऊनही रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष आणि काही वेळा खोटी माहिती देत असल्याने रेल्वे प्रशासनाला जाग आणण्यासाठी २० सप्टेंबर रोजी विलवडे रेल्वे स्टेशन समोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला
सदर उपोषणाची जबाबदारी विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई व ग्रामीण दोघांनी घेऊन मोठ्या प्रमाणात उपोषणाचा कार्यक्रम यशस्वी करण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतरही मागण्याची पूर्तता झाली नाही तर २३ ऑक्टोबर रोजी बेलापूर कोकण रेल्वे कार्यालय येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे आहे .आणि त्यानंतर सुद्धा आमच्या मागण्या मान्य न झाल्यास किंवा रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास २३ नोव्हेंबर रोजी मोठ्या प्रमाणात रेल रोको आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी खास मार्गदर्शन मुंबई संघटनेचे सल्लागार सुभाष लाड यांनी केले. यानंतर विलवडे रेल्वे स्टेशन प्रमुख सुबोध भाटकर यांना संघटना कार्यकारणी तर्फे निवेदन देण्यात आले. लांजा तालुका पूर्व भाग व राजापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या सभेला आवर्जून हजेरी लावली होती.














