विनापरवाना ३०.९३ लाख रुपये किमतीचा कीटकनाशकांचा साठा जप्त : गुन्हा दाखल
वेंगुर्ले : दाजी नाईक
विनापरवाना कीटकनाशकांची साठवणूक केल्याप्रकरणी वेंगुर्ल्यातील श्रीराम कृषी केंद्राचे संचालक रामराजा सुरेश लामकाणे यांच्यावर कृषी विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत विविध २६ प्रकारची कीटकनाशके जप्त करण्यात आली असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३० लाख ९३ हजार ४१५ रुपये आहे.
कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. यावेळी एकूण १,६१४.७५ किलो/लिटर कीटकनाशकांचा साठा आढळून आला. संबंधितांकडे कीटकनाशके साठवणुकीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे निदर्शनास आल्याने हा साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कीटकनाशके अधिनियम १९६८ तसेच कीटकनाशके नियम १९७१ अंतर्गत कारवाई वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) प्रकाश मोहिते यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली. कारवाईच्या पथकात प्रकाश मोहिते, जिल्हास्तरीय भरारी पथक प्रमुख राहुल माने, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुशांत भोसले आणि कृषी सेवक पंकज पाटील यांचा समावेश होता.
कृषी निविष्ठांची अनधिकृत साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले













