चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावर्डे येथे वैद्यकीय शिक्षणासाठी आलेल्या एका तरुणीला युवकाने सहकाऱ्यांचे मदतीने फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षणासाठी विविध जिल्हे व राज्यांमधून येणारे विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ यांच्यामध्ये या घटनेमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदू संमेलन समिती आणि शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्था, सावर्डे यांच्या वतीने सुमारे ५० कार्यकर्ते व सभासदांनी सावर्डे पोलीस स्थानकात जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले. निवेदनामध्ये संबंधित प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपींना तात्काळ अटक करावी, व संबंधित तरुणी आणि विविध क्षेत्रातील विद्यार्थिनी यांना अभय मिळवून द्यावे अशी मागणी अध्यक्ष केतन पवार यांनी केली आहे. तसेच याबाबत बोलताना पवार म्हणाले की, अशा विद्यार्थिनी येथील विविध शैक्षणिक संस्थांच्या क्षेत्रातून गायब होत राहिल्या तर चिपळूण तालुक्यात पर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊन शिक्षण क्षेत्र व व्यापारावर याचा मोठा गंभीर परिणाम होऊ शकतो. निवेदनानुसार, संबंधित तरुणी काही दिवसांपासून बेपत्ता असून तिचा शोध घेण्यासाठी तसेच प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे सावर्डे परिसरात विविध स्तरांतून संताप व्यक्त होत असून बाहेरून येणाऱ्या, आणि स्थानिक विद्यार्थिनींची सुरक्षा आणि आठ दिवस होऊन ही विद्यार्थिनीचा काही पत्ता न लागल्याने शिक्षण नगरी सावर्डे येथे कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला असून सर्व संबंधित बाबींची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अफवा पसरवू नयेत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पोलीस खात्यामार्फत करण्यात येत आहे.













