चिपळुणात पुन्हा आढळलं दुर्मिळ पांढरं मुंगूस; निसर्गाचा अद्भुत चमत्कार!

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण परिसरात पुन्हा एकदा दुर्मिळ पांढऱ्या रंगाचे मुंगूस आढळून आले आहे. या दुर्मीळ वन्यजीवाचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिक आणि वन्यजीवप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
यापूर्वीदेखील चिपळूण परिसरात पांढऱ्या रंगाचे मुंगूस आढळून आल्याची नोंद झाली होती. सामान्यतः मुंगूसाचा रंग राखाडी किंवा तपकिरी असतो. मात्र, रंगद्रव्यातील बदलामुळे त्याचा रंग पांढरा दिसू शकतो. यापूर्वी चिपळूणमध्ये आढळलेल्या पांढऱ्या मुंगूसाबाबत वनविभागाने या आनुवंशिक स्थितीमुळे असा रंग दिसत असल्याचे स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे, परिसरात एकाचवेळी मुंगूसांच्या कळपाचे दर्शन होत असल्याने निसर्गप्रेमींमध्ये अधिकच कुतूहल निर्माण झाले आहे. कोकणच्या समृद्ध जैवविविधतेचे हे आणखी एक आगळेवेगळे दर्शन मानले जात आहे. पांढऱ्या मुंगूसाचे दर्शन दुर्मीळ असल्याने त्याला त्रास न देता सुरक्षित अंतरावरून निरीक्षण करावे, तसेच त्याचा पाठलाग किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वन्यजीवप्रेमींकडून करण्यात येत आहे.