अखिल मुंबई कोकण प्रसादिक भजन मंडळाचा वर्धापन दिन सोहळा 23 ऑगस्ट रोजी!

मसुरे | झुंजार पेडणेकर

अखिल मुंबई कोकण प्रसादिक भजन मंडळाच्या नालासोपारा-विरार- वसई शाखेच्या वतीने वर्धापन दिन सोहळा २३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. विरार पश्चिम येथील स्वामीनारायण मंदिराजवळील ओल्ड विवा कॉलेज क्रॉस रोडवरील धिमही बँक्वेट हॉल येथे दुपारी १.३० ते रात्री ९.३० वाजेपर्यंत हा सोहळा होणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात दुपारी १.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने होईल. त्यानंतर दुपारी २ वाजता भजनी परंपरेनुसार भजनाची सुरुवात होणार असून, दुपारी २.३० वाजता उपस्थित नवोदित कलाकारांचे अभंग गायन आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता पाहुणे व वयोवृद्धांचा सत्कार तसेच उपस्थित भजनी कलाकारांना सहभाग प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.

सायंकाळी सहा वाजता
अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ यांच्याकडून भजन सम्राट बुवा श्री पंडित बाळासाहेब वाईकर व भजन सम्राट बुवा श्री नारायण वाळवे व पखवाज तालमणी रायगड भूषण श्री प्रतापराज पाटील या सर्वांना जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री श्री आशिषजी शेलार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

सायंकाळी ६.३० वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक संगीत अलंकार पंडित श्री. बाळासाहेब वाईकर गुरुजी यांचे सुरेल गायन होणार आहे. या कार्यक्रमाला विशेष आकर्षण म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध तबलामणी पंडित श्री. प्रतापराज पाटील तसेच सुप्रसिद्ध पखवाज-तबला कलाकार श्री. कुणाल पाटील यांची विशेष जुगलबंदी व पखवाज सोलोवादनाची मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. या भक्तिमय व सांस्कृतिक सोहळ्यास नागरिक, भजनप्रेमी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.