अवघी एकच निविदा नगरपालिकेकडे दाखल
दोन दिवसात निविदा उघडणार
चिपळूण (वार्ताहर ): येथील नगर पालिकेची एक इमारत मोडकळीस आली असून ती धोकादायक बनली आहे. यापूर्वीच या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले होते. नगर पालिका प्रशासनानेही मुख्य इमारतीच्या मागील भाग धोकादायक बनला असल्याचा फलक उभारला होता, त्यानंतर आता ही इमारत तोडण्यासाठी निविदा प्रक्रिया तिसऱ्यांदा राबविण्यात आली. मात्र त्यालाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. या कामासाठी एकच निविदा आली आहे. येत्या दोन दिवसांत ही निविदा उघडून पुढील प्रक्रिया प्रशासनाकडून तातडीने केली जाणार आहे.
चिपळूण नगर पालिकेची इमारत ब्रिटीशकालीन आहे. नगर पालिकेच्या दोन्ही इमारतीही आता जुन्या झाल्या आहेत. या इमारतीच्या दुरावस्थेला अनेक कारणे असून ज्या इमारतीमधून शहर विकासासाठी दरवर्षी करोडो रूपयांचा निधी दिला जातो. त्याच इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे सुरुवातीपासून दुर्लक्ष झाले आहे. दोन्ही इमारतींचा काही भाग ढासळू लागला आहे. पावसाळ्यात या इमारतीला जागोजागी गळती लागते. दोन वर्षांपूर्वी मुख्य इमारतीची तात्पुरती डागडुजी करण्यात आली. परंतु मुख्य इमारतीच्या मागील बाजूस असलेली उपइमारतीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे या जागी भव्य इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. याविषयी २३ सप्टेंबर २०२१ रोजी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून इमारती धोकादायक बनल्याने येथून नगर पालिकेचा कारभार अन्य ठिकाणी हलवावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी नगर परिषद प्रशासनाला या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घेण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार कार्यवाही सुरु असताना दुसरीकडे नगर पालिकेची उप इमारत पाडण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
नुकतीच याबाबतची तिसरी निविदा प्रसिद्ध केली होती. यामध्ये इमारत तोडून जागा सपाटीकरण केले जाणार आहे. मात्र हा खर्च इमारतीच्या जुन्या साहित्यातून केला जाणार आहे. त्यासाठी जो ठेकेदार जादा दर देईल, अशा ठेकेदारलाच हे काम दिले जाणार आहे. त्याप्रमाणे या कामाला एकाच ठेकेदार कंपनीकडून प्रतिसाद मिळाला आहे. मात्र तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याने येत्या दोन दिवसांत निविदा उघडून है काम कायम केले जाण्याची शक्यता आहे.












