राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत सिंधुदुर्गची मान उंचावली
शिरगांव (प्रतिनिधी) : भारतीय ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रोबोटॉर्म टेक्नॉलॉजी प्रा. लि., कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित ‘राज्यस्तरीय शालेय रोबोटिक्स इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादात जिल्हा परिषद शाळा गटातून देवगड तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा तोरसोळे हिने चमकदार कामगिरी करत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत महानगरपालिका शाळा गट, जिल्हा परिषद शाळा गट (सर्व जिल्हे) तसेच अटल व STEM लॅब गटांचा समावेश होता. तोरसोळे शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून साकारलेल्या नाविन्यपूर्ण रोबोटिक्स प्रकल्पांचे सादरीकरण करत परीक्षण समितीचे लक्ष वेधून घेतले. या यशामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची तंत्रज्ञानविषयक क्षमता अधोरेखित झाली आहे.
तोरसोळे शाळेच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद सदस्य देवदत्त कदम, जिल्हा परिषद सदस्या शीतल तावडे, सरपंच तेजस्विनी पवार, उपसरपंच सुहास (बंटी) पवार, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, केंद्रप्रमुख बापू खरात आणि मुख्याध्यापक सत्यवान चव्हाण यांनी मार्गदर्शक शिक्षक किरण पवार तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.
या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सुप्त तंत्रज्ञान कौशल्यांना राज्यस्तरीय व्यासपीठ मिळाले असून, तोरसोळे शाळेच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची शैक्षणिक क्षेत्रातील मान उंचावली आहे.











