१२ व १३ सप्टेंबरला मुख्य बाजारपेठेत वाहनांना प्रवेशबंदी
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले नगर परिषदेच्या सभागृहात गणेशोत्सव नियोजन बैठक नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पार्किंग व्यवस्था, अवजड वाहने, बसेस यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच खरेदीसाठी गणेशोत्सवा निमित्त १२ व १३ सप्टेंबरला मुख्य बाजारपेठेत सर्व वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील गर्दी, वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या लक्षात घेऊन चारचाकी, दुचाकी, तीनचाकी व मालवाहू वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. चारचाकी वाहनांसाठी गणेश कॉम्प्लेक्स, शाळा क्रमांक १, सिद्धिविनायक प्लाझा, कन्याशाळा, नगरवाचनालय, पाटील सेंटर, लता अपार्टमेंट तसेच महालक्ष्मी कॉम्प्लेक्स समोरील मोकळ्या जागेचा विचार करण्यात आला आहे. तर दुचाकी वाहनांसाठी वेंगुर्लेकरवाडी व रामेश्वर मंदिर परिसर, तर मालवाहू तीनचाकींसाठी सप्तसागर ते मारुती मंदिर परिसराचा वापर करण्याचे नियोजन आहे. मोठ्या वाहनांसाठी सागररत्न मत्स्यबाजारासमोरील मोकळी जागा, सप्तसागर, रामेश्वर मंदिर, मराठी शाळा क्रमांक १ चे पटांगण आदी ठिकाणांचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
१० ते २६ सप्टेंबरदरम्यान अवजड वाहनांना पर्यायी मार्ग
गणेशोत्सव कालावधीत १० ते २६ सप्टेंबर या कालावधीत शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. हॉस्पिटल नाका ते दाभोली नाका या मुख्य मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक नियंत्रित करून त्यांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आवश्यक ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. याच काळात एस.टी. बसचा थांबा दरवर्षीप्रमाणे रामेश्वर मंदिराजवळ ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रामेश्वर मंदिर व हॉस्पिटल नाका येथे एस.टी. महामंडळाकडून कर्मचारी नियुक्त करण्याची सूचना करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या माटवीच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने १२ व १३ सप्टेंबर रोजी बॅ. खर्डेकर रोडवरील मारुती मंदिर ते दाभोली नाका या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. या दोन दिवसांत रस्त्याच्या दुतर्फा किरकोळ व्यापाऱ्यांना माटवीचे साहित्य विक्रीसाठी जागा देण्यात येणार आहे. रिक्षांसाठी मुख्य बाजारपेठेत एकेरी मार्गाची (वन-वे) व्यवस्था करण्यात येणार आहे. गणपती विसर्जनानंतर पाच दिवसांनी याच मार्गावर चारचाकी वाहनांसाठीही एकेरी वाहतुकीची व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.
शहरात ट्रॅव्हल्स थांबविण्यास बंदी
गणेशोत्सव कालावधीत शहरातून जाणाऱ्या ट्रॅव्हल्सना शहरातील रस्त्यांवर थांबण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. ट्रॅव्हल्ससाठी मानसीश्वर उद्यानासमोरील मोकळी जागा आणि कॅम्प येथील स्टेडियमशेजारील मोकळी जागा या दोन ठिकाणाची थांबण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठीही वेळ निश्चित करण्यात आली आहे. १० ते २६ सप्टेंबरदरम्यान रात्री ९ ते पहाटे ५ या वेळेतच मालवाहू वाहनांना शहरात माल वाहतूक करता येणार आहे. इतर दिवशी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत मालवाहतुकीस परवानगी देण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर : स्पर्धेचे आयोजन
गणेशमूर्ती मातीच्या अथवा शाडू मातीच्या असाव्यात, यावर नगरपरिषदेने भर दिला आहे. गणेशमूर्तीभोवतीची सजावटही प्लास्टिक व थर्माकोलमुक्त असावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. प्लास्टिक किंवा थर्माकोलचा वापर निदर्शनास आल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांनी निर्माल्य निर्माल्य कलशातच टाकावे असे आवाहन ही गिरप यांनी केले आहे.













